काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ यांच्या चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच औचित्य साधून चला हवा येऊ द्या च्या टीमने अशोक सराफ यांना आपल्या शोमध्ये आमंत्रित केले आहे.
यावेळी अशोक सराफ यांच्यासोबत त्यांच्या ९०च्या दशकातल्या नायिका देखील हजेरी लावताना दिसणार आहेत.त्यामुळे मराठी सृष्टीतील अनेक किस्से यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. ह्या आठवड्यात चला हवा येऊ द्याच्या शोमध्ये अशोक सराफ यांच्यासोबत निवेदिता सराफ, किशोरी शहाणे, अलका कुबल, निशिगंधा वाड, प्रिया बेर्डे या पाच नायिका हजेरी लाऊन धमाल करणार आहेत. अशोक सराफ यांच्यासोबत या पाचही नायिकांनी काम केलं आहे. त्यामुळे एकमेकांसोबत काम करत असताना त्यांचे अनुभव कसे होते सोबतच त्यांनी कोणकोणती धमालमस्ती केली हे या मंचावर अनुभवायला मिळणार असल्याने या भागाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. अशोक सराफ यांचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले ते ओघानेच.
त्यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर ययाती आणि देवयानी हे त्यांनी अभिनित केलेलं पहिलं नाटक. या नाटकात त्यांना विदूषकाची भूमिका मिळाली होती. १९६७ साली अशोक सराफ यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते अगदी अनपेक्षितपणेच कारण अभिनयाला विरोध करणारे त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांना अशोक सराफ यांनी या क्षेत्रात यावे असे मुळीच वाटत नव्हते. कारण हे क्षेत्रच मुळात बेभरवशाचे त्यामुळे पुरेसा पैसा मिळेल की नाही याचीही शाश्वती देता येत नव्हती. गोपीनाथ सावकार यांनी अनेक दर्जेदार नाटक प्रेक्षकांसमोर आणली त्यातून अनेक कलाकारांना त्यांनी घडवले. गोपीनाथ सावकार हे अशोक सराफ यांचे मामा. त्यांच्या नाटकाच्या तालमीला अशोक सराफ नेहमी हजर राहायचे.
त्यामुळे ‘ययाती आणि देवयानी’ हे नाटक त्यांना अगदी तोंडपाठ झाले होते. पुढचा डायलॉग काय असेल हे अगोदरच पाठ असल्याने अभिनयाची आवड त्यांच्यात निर्माण झाली होती. एकदा बेळगावात असताना नाटकातील छोटू सावंत हा कलाकार आजारी पडला त्यावेळी ‘तू या धंद्यात अजिबात यायचं नाही.’ असं म्हणणाऱ्या मामांनीच अशोक सराफ यांना विदूषकाची भूमिका दिली होती. त्यानंतर अशोक सराफ यांचे चित्रपट सृष्टीत पाऊल पडले. १९७३ च्या दरम्यान आशोक सराफ यांना चित्रपटातून अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे आता त्यांच्या ५० वर्षांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीला चला हवा येऊ द्या च्या मंचावर उजाळा दिलेला पाहायला मिळणार आहे.