सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहिनी अग्रेसर ठरलेली पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बहुतेक सर्वच मालिका टॉप १० च्या यादीत स्थान मिळवताना दिसल्या आहेत या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी झी मराठी वाहिनीने देखील कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तू तेव्हा तशी आणि मन उडू उडू झालं या झी मराठीच्या तीन मालिका टॉप १० च्या यादीत आहेत मात्र आता ही वाहिनी लवकरच नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. ‘सत्यवान सावित्री’ ही पौराणिक मालिका येत्या १२ जूनपासून झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे.

गोष्ट एका स्त्रीच्या ईच्छा शक्तीची, गोष्ट सावित्रीच्या दृढ निश्चयाची. अशा या सावित्रीचा प्रवास मालिकेतून उलगडताना दिसणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेत सत्यवान सावित्रीची बालपणीची भूमिका बालकलाकार राधा धारणे हिने निभालेली आहे. राधा धारणे हीने अभिनित केलेली ही दुसरी मालिका ठरणार आहे. कारण या मालिकेअगोदर राधाने सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत आनंदीची भूमिका साकारली होती. आनंदीची भूमिका ही एक स्पेशल चाईल्ड म्हणून ओळखली जाते असे असले तरी गणितात मात्र ती अतिशय हुशार दाखवली होती. ही भूमिका राधाने तिच्या निरागस अभिनयाने सुरेख वठवली होती.

या मालिकेमुळे राधाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. सत्यवान सावित्री या मालिकेत ती बालपणीची सावित्रीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे राधा साठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजींद ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या वेळेत सत्यवान सावित्री ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मन झालं बाजींद या मालिकेत सतत तेच तेच घडत असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे आता ही मालिका आटोपती घेण्यात येऊ लागली आहे.
कृष्णाचे सीए होणे सार्थकी झालेले पाहायला मिळत आहे. राया आणि कृष्णा यांच्यातील दुरावा मिटणार आहे तर दुसरीकडे गुली मावशीचे कटकारस्थान देखील उघडकीस येणार आहे त्यामुळे लवकरच ही मालिका एक्झिट घेणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मन झालं बाजींद ही मालिका सुरुवातीला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसली मात्र गुरुजींनी केलेल्या भाकितामुळे ही मालिका अंधश्रद्धा पसरवण्यावर भर देऊ लागली असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले होते. म्हणून प्रेक्षकांनी या मालिकेच्या कथानकावर नाराजी दर्शवली होती.