गेल्या काही महिन्यांपासून अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यात प्रामुख्याने ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले पाहायला मिळाले आहे. या चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर चांगली कमाई देखील केली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते मामांची भूमिका स्वतः प्रवीण तरडे साकारणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गश्मीर महाजनी निभावणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला होता.
‘महाराजांचे स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा. वीर मराठा, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट!’ असे टिझरमध्ये म्हणणारे हंबीरराव मामा बाहुबली फेम प्रभासला देखील भुरळ पाडताना दिसले. चित्रपटाचा टिझर प्रभासने सोशल मीडियावर शेअर करून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे असे म्हटले होते. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे ही देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सौ लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते ही व्यक्तिरेखा ती आपल्या सहजसुंदर अभिनयाने साकारणार आहे. प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी अनेक चित्रपटातून एकत्र काम केले आहे.
देऊळ बंद या चित्रपटात ते दोघे पती पत्नीच्याच भूमिकेत झळकले होते. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात देखील ते पती पत्नीची भूमिका साकारणार आहेत. ‘ही तीच माऊली जीने दिला जन्म छत्रपती ताराराणींना’ असे म्हणत या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये स्नेहल तरडे झळकताना दिसत आहे. बाहुबली आणि बाहुबली २ हे दोन्ही सुपरहिट चित्रपट मराठीमध्ये डब करण्यात आले याची जबाबदारी स्नेहल तरडे यांनी पार पाडली होती. मूळ कथानकाला कुठेही बगल न देता शब्द आहेत तसे चित्रपटात दाखवण्यात आले असल्याने अमोल कोल्हे यांनी स्नेहल तरडे यांचे कौतुक केले होते. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात स्नेहल महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे हा चित्रपट स्नेहलसाठी खूपच खास ठरणार आहे.