मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध होत आहे. ७ मे २०२२ रोजी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवानी रांगोळे ही मृणाल कुलकर्णी यांची होणारी सून आहे.
त्यामुळे आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्याला त्यांनी सेलिब्रिटींना आवर्जून हजेरी लावण्यास सांगितली आहे. शिवानी आणि विराजस यांचे प्रिवेडिंग फोटोशूट देखील नुकतेच करण्यात आले आहे. लग्नाला काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने होणाऱ्या नववधूच्या केळवणाचा थाट देखील साजरा केला जात आहे. नुकतेच शिवानीच्या जवळच्या मित्रमंडळींनी तिचे केळवण साजरे केले आहे. त्याचे काही खास फोटो तीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विराजस आणि शिवानी यांनी गुपचूप साखरपुडा केला होता त्यामुळे आता त्यांच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटात सजलेला पाहायला मिळणार आहे. लग्नाच्या चार दिवस अगोदर ग्रहमखपूजन, मेहेंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळा अशी लगीनघाई पाहायला मिळणार आहे.
लग्नसोहळ्याचा थाट कसा असेल हे पाहण्यासाठी चाहते तितकेच उत्सुक आहेत. आपल्या भावी सुनेबद्दल मृणाल यांनी म्हटले होते की, “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत. विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रीण त्याला मिळावी. आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे. आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.” विराजस आणि शिवानीचा हा प्रेमविवाह असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. मृणाल कुलकर्णी यांचा देखील प्रेमविवाह आहे. त्यामुळे आपल्या मुलाने जोडीदार म्हणून जीची निवड केली आहे, त्याला माझा कधीच विरोध नसेल असे त्या म्हणाल्या होत्या.