मन झालं बाजिंदमध्ये होणार दादासाहेबांची एन्ट्री कधी गैरसमजातून तर कधी रागाच्या भरातून मन झालं बाजिंद या मालिकेतील कृष्णा आणि राया यांच्या नात्यात काही ना काही दुरावा येतोच. त्यात रायाशी लग्न होणाऱ्या बायकोच्या जीवाला धोका असेल या भविष्यवाणीचा फटका कृष्णाला अनेकदा बसला आहे. या भविष्यवाणीच्या आधारे रायाची गुली मावशी काही ना काही काटा काढण्यासाठी कट रचत असते. एकूणच काय तर हळद उत्पादनातील बडं प्रस्थ असलेल्या विधातेंच्या घरात घडणारं नाट्य हे या मालिकेत रंजक वळण आणत असतं. नुकत्याच प्रसारीत झालेल्या प्रोमोमध्ये दादासाहेब विधाते हे नाव समोर येत आहे.
रायाचे आजोबा म्हणजे फुई आजीचे यजमान दादासाहेब यांची या मालिकेत लवकरच एन्ट्री होणार असून दादासाहेब नेमके कुठे गेले. आणि आता ते विधात्यांच्या घरी पुन्हा का येणार आहेत या प्रश्नांची उत्तर पाहण्याचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. वैभव चव्हाण आणि श्वेता खरात ही जोडी या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. शिक्षणासाठी कितीही कष्ट सोसणारी कृष्णा आणि शिक्षणाचा गंधही नसलेला राया अशी हटके जोडी या मालिकेत पहायला मिळत आहे. सीएचा अभ्यास करणाऱ्या कृष्णाच्या आयुष्यात असे काही वळण येते की तिला रायभान विधाते म्हणजेच राया सोबत मनाविरूध्द लग्न करावे लागते. तर रायालाही कृष्णासारखी शिकलेली बायको नको असताना त्यांची लग्नगाठ बांधली जाते.
या नोटवर राया आणि कृष्णाचा संसार सुरू होतो. पण सहवासातून त्यांच्या प्रेम फुलायला लागते. या दोघांच्या नात्याला कायमच विरोध करणारी गुली मावशी राया आणि कृष्णाला वेगळं करण्यासाठी कट रचते. त्याच कटात राया आणि कृष्णा सापडतात आणि त्यांच्या गैरसमज, अविश्वास अशी दरी निर्माण होते. अशा काही प्रसंगांमुळे गेल्या काही दिवसात या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये कृष्णा फुई आजीला ज्या दादासाहेबांच्या स्वभावाविषयी विचारत असल्याचे दाखवले आहे. ते दादासाहेब म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून रायाचे आजोबा आणि भाऊसाहेब विधाते यांचे वडील आहेत. आजपर्यंत या दादासाहेबांचे नावही विधात्यांच्या घरात नव्हते तिथे त्यांची एन्ट्री होणार आहे.
मग ते आजपर्यंत नेमके कुठे होते? घर सोडून ते का गेले होते? आणि आता पुन्हा घरी येण्याचे कारण काय असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात डोकावले आहेत. फुईआजीच्या म्हणण्यानुसार स्वभावाने चांगले, मदतीला धावून जाणारे, वावगं काहीही न खपणारे दादासाहेब. यांना विधात्यांच्या घरी आल्यावर राया आणि कृष्णाच्या नात्याला त्यांचा काय फायदा होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अर्थात दादासाहेब विधाते यांच्या भूमिकेत कोणता कलाकार पडदयावर झळकणार, हे अजून गुलदस्त्यात ठेवलं असून मंदिराच्या कळसावरील झेंडा लावत असताना तो रायाच्या हातून निसटतो. तो थेट दादासाहेबांच्या हातात येतो. असा सीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याने दादासाहेबांची भूमिका कोण करणार ही उत्सुकताही आहेच.