प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अनेक भक्तिगीतं, भीमगीतं तसेच लोकगीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंड पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते तर त्यांची आज्जी सोनाबाई या तबलावादक होत्या. सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. त्यांचे घराणे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील परंतु त्यांचे बालपण मुंबईमध्ये गेले. आनंद शिंदे यांनी गायलेली गाणी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर बॉलिवूड जगताला देखील थिरकायला लावणारी आहेत.
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनी देखील संगीत क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतली. आनंद शिंदे यांना हर्षद, उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत. हर्षद शिंदे हे ऍनिमेशन इंजिनिअर आहेत. त्यांचा मुलगा आल्हाद शिंदे हा शिंदे घराण्याची पाचवी पिढी म्हणून संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे. लहानपणापासून आल्हादला संगीताची आवड आहे. झी टॉकीजसारख्या मंचावरून त्याने प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली लोकप्रिय गीतं सादर केली आहेत. नुकतेच सोनी मराठी वाहिनीसारख्या मंचावरून त्याला गाणी सादर करण्याची संधी मिळाली. रविवारी बोला जय भीम हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमात आल्हाद शिंदे हा देखील परफॉर्मन्स सादर करताना दिसला.
हा परफॉर्मन्स सादर करत असताना आल्हादच्या मनात नेमकं काय चाललं होतं, हे त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात तो म्हणतो की, दोन वर्षांनी परत तुम्हा सर्वांसमोर सादर झाल्याचा आनंद वाटतो. खूप धमाल केली, खूप काही शिकायला मिळालं. आणी माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट ही होती की आज मला माझ्या आजोबांसमोर म्हणजेच आनंद शिंदे यांच्या समोर माझं गाणं “पुस्तक भिमाचं रमाईचं” गायचे होते. मग ते गाणं परफेक्ट होणे ह्याची जबाबदारी घेऊन, माझे काका उत्कर्ष शिंदे आणी आदर्श शिंदे ह्यांनी मला खूप मदत केली. जरी आम्ही एक परिवार असलो, तरी त्या क्षणाला ते माझे गुरु होते आणी मी त्यांचा शिष्य होतो.
ही माझ्यासाठी एक अवघड परीक्षा होती. जेव्हा माझं गाणं संपलं, जी पहिली गोष्ट मी पाहिली ती म्हणजे पपांचे डोळे भरुन आले होते. मला पपांनी सांगितले “मी तुला लहानपणा पासून, प्रल्हाद दादा बोलायचो. आज पासुन तूच माझा प्रल्हाद दादा आहेस.” हे ऐकून मला रडू आले. माझे काका आणि माझे आजोबा ह्यांनी भरभरून आशिर्वाद दिले. असंच माझ्यावर आणि शिंदेशाहीवर प्रेम करत राहा. सोनी मराठी हि संधी दिल्याबद्दल त्यांचेही त्याने धन्यवाद मानले. दैदिप्यमान शिंदेशाही बाणा असाच पुढे चालविण्यासाठी आल्हादला शुभेच्छा.