झी मराठी वाहिनीवर गेल्या १८ वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकरांचा हा शो झी मराठीचा आता अविभाज्य भाग म्हणून ओळखला जात आहे. होम मिनिस्टर मधून आदेश बांदेकर सूत्रसंचालन करत देशभरातील वहिनींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता ह्या शोमध्ये अनेक मोठे बदल केले असल्याने या शोची उत्सुकता अधिक वाढलेली पाहायला मिळणार आहे. कारण आता गृहिणींना तब्बल एक दोन नव्हे तर चक्क ११ लाखांची पैठणी मिळवण्याची नामी संधी मिळणार आहे. येत्या ११ एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो ‘महामिनिस्टर’ या पर्वात बदलणार आहे. अगोदर हा शो संध्याकाळी ६ ते ६.३० पर्यंत झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होता.
मात्र आता या नव्या पर्वात अनेक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. सोमवार ते शनिवार महामिनिस्टर आता एक तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या मनोरंजनासोबतच आता गृहिणींना तब्बल ११ लाखांची पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम गृहिणी आता भलत्याच खुश झालेल्या असून आदेश बांदेकर आपल्या घरी ही पैठणी घेऊन यावेत अशी प्रत्येकीची मनोमन इच्छा आहे. आता ही ११ लाखांची पैठणी कशी दिसत असावी? असा प्रश्न सामान्य गृहिणींना मात्र नक्कीच पडला असणार. त्यांची ही उत्सुकता ११ एप्रिलला झी मराठी वाहिनीवरून उलगडताना दिसणार आहे. महामिनिस्टर या नव्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मजेशीर प्रोमोमध्ये सुचित्रा आदेश बांदेकर सोबत वाद घालताना दिसते.
गेल्या १८ वर्षात ५००० गृहिणींना पैठणी देऊन सन्मानित केले, मात्र मला एकही पैठणी तुम्हाला द्यावीशी नाही वाटली? आणि आता तर काय महामिनिस्टर घेऊन जाणार ११ लाखांची पैठणी, असे म्हणत असतानाच आदेश बांदेकर यांची बोलतीच बंद झालेली पाहायला मिळाली. महामिनिस्टर या शोचा एक तासाचा भाग टेलिकास्ट होत असल्याने झी मराठी वाहिनीवरील घेतला वसा टाकू नको ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. घेतला वसा टाकू नको या मालिकेतून विविध सणांची आणि व्रतांची माहिती देण्यात येत होती. या मालिकेच्या माध्यमातून अनेक नवख्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली होती. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.
90 A/201 TIvoli prathamesh survey no plot 74/2a/2b on kewadi village panvel kevale Raigarh Maharashtr pin code 410206