ज्युनिअर एन टी रामाराव आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित RRR चित्रपट २५ मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू होती. चित्रपटातली गाणी अगोदरच हिट ठरल्यामुळे हा चित्रपट तुफान यशस्वी ठरणार अशी अपेक्षा होती. राजामौली यांचे भन्नाट दिग्दर्शन आणि विजयेंद्र प्रसाद यांचे कथालेखन प्रेक्षकांना चित्रपटगृह पर्यंत खेचून आणण्यास सक्षम होते. त्यात भरीस भर म्हणजे ज्युनिअर एन टी आर, राम चरण या सुपरस्टार्सची जुळून आलेली केमिस्ट्री चित्रपटातून प्रेक्षकांना तुफान आवडली होती. राजामौली आणि बिग बजेट सिनेमा हे ठरलेले गणित. बाहुबली हा त्यांचेच दिग्दर्शन असलेला बिग बजेट मुव्ही सुपरडुपर हिट ठरला.
त्याच पार्श्वभूमीवर RRR चित्रपटाचे बजेट ५५० कोटींच्या घरात जाऊन पोहोचले. त्यामुळे हा बिग बजेट मुव्ही जरी असला तरी तो प्रेक्षकांच्या मनात कसा रुजवायचा याचा पुरेपूर अभ्यास करूनच चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. त्यात भर म्हणजे अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे बॉलिवूड कलाकार या चित्रपटात पाहायला मिळाले. त्यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री होती. अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या संघर्षाची ही कथा आहे. ब्रिटिश वसाहती विरोधात आवाज उठवणाऱ्या या दोन स्वातंत्र्य सेनानीचा संघर्ष चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणली आहे. जगभरातून या चित्रपटाने २२३ कोटींचा रेकॉर्डब्रेक गल्ला जमा केलेला पाहायला मिळाला.
आंध्रप्रदेश राज्यातून चित्रपटाला जास्त प्रतिसाद मिळाला असून, या एकाच राज्याने बॉक्स ऑफीसवर तब्ब्ल ७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, केरळ असे संपूर्ण भारतात एकूण १५६ कोटींचा गल्ला या चित्रपटाला मिळाला आहे. तर भारताबाहेरून पहिल्याच दिवशी ६७ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. बाहुबली २ या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात ५०० कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला होता. तर जवळपास दोन हजार कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली होती. RRR हा चित्रपट बाहुबली २ चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडेल असे बोलले जात होते. दुर्दैवाने हा रेकॉर्ड मोडण्यात ते अपयशी ठरले. असे असले तरी पहिल्या दिवसाची कमाई पाहता चित्रपट १००० कोटींचा टप्पा नक्की गाठेल अशी आशा आहे.