आजवर अनेक राजकीय नेत्यांवर तसेच खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहेत. महेंद्र सिंग धोनी, सायना नेहवाल अशा स्टार खेळाडूंच्या बायोपिकच्या यादीत आता प्रवीण तांबे हे नाव गाजताना दिसत आहे. ज्या वयात खेळाडू निवृत्ती स्वीकारतात त्याच वयात करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रवीण तांबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ९ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर १ एप्रिल २०२२ रोजी डिसनी प्लस हॉट स्टारवर ‘कौण प्रवीण तांबे?’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन जयप्रसाद देसाई यांनी केले असून प्रवीण तांबेची मुख्य भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार आहे.
या चित्रपटात आशिष विद्यार्थी, परमब्रत चॅटर्जी, अंजली पाटील हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी तसेच तमिळ आणि तेलगू या तीन भाषेत प्रदर्शित होत आहे. इकबाल या चित्रपटात श्रेयस तळपदेने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. तशाच धाटणीचा आणखी एक हिंदी चित्रपट त्याला साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षीच सुरू करण्यात आले होते. प्रवीण तांबे कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे मात्र क्रिकेट प्रेमींसाठी हे नाव तसे नवखे नाही. प्रवीण यांनी आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०१२ साली वयाच्या ४१ व्या वर्षी प्रवीण यांनी विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण केले होते. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघासाठी ते आयपीएलमध्ये खेळले.
आयपीएल च्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून प्रवीण तांबे यांचे नाव घेतले जाते. टी १० लीग, कॅरेबियन लीग ह्या सामन्यांमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या खेळातील योगदानाकडे पाहून वय हा केवळ एक आकडा आहे असेच म्हटले जाते. त्यांच्या याच कारकिर्दीचा आढावा बायोपिक मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रेयस तळपदे आपल्या अभिनयातून ही भूमिका सुंदर वठवणार याची खात्री असल्याने त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिली आहे. चित्रपट समीक्षक तारण आदर्श यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांसमोर आणले आहे.
ज्यात श्रेयस तळपदे ४१ वयाच्या प्रवीण तांबेच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच बाजूला महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांचेही फोटो त्यात पाहायला मिळतील. येत्या बुधवारी ९ मार्च २०२२ रोजी कौण प्रवीण तांबे? या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातून हा चित्रपट कसा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना बांधता येणार आहे. या आगामी बायोपिकसाठी श्रेयस तळपदे देखील खूपच उत्सुक असलेला पाहायला मिळतो आहे.