तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी, याने नुकतीच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आहे. रंगा पतंगा, जर्णी प्रेमाची, हापूस, अस्मिता, राधा ही बावरी, क्राईम पेट्रोल, स्वप्नांच्या पलीकडले या आणि अशा मालिका चित्रपटातून हार्दिक जोशीने विविध भूमिका साकारल्या आहेत. झी मराठी वाहिनीने त्याला तब्बल दोन मालिकेतून मुख्य नायक बनण्याची संधी मिळवून दिली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर झी वाहिनीच्याच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून तो सिद्धार्थची भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या या मालिकेतून हार्दिक जोशीने साकारलेला सिद्धार्थ आदितीच्या बाबत विरोधी भूमिका घेत असल्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर नाराजी दर्शवली आहे.
अर्थात ही भूमिका मालिकेच्या कथानकाला अनुसरून असल्याने त्याच्यावर टीकाही केली जात आहे. हीच त्याच्या सजग अभिनयाची पावती प्रेक्षकांकडून मिळताना दिसत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर हार्दीकने व्यवसाय क्षेत्रात नशीब आजमावण्याचे ठरवले. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील खाऊ गल्ली, खास बाग मैदान येथे ‘राणादा’ या नावाने त्याने बदाम थंडाईचे फूड कॉर्नर थाटले आहे. आपल्या व्यवसायाचे वैशिष्ट्य सांगताना हार्दिक जोशी म्हणतो की, बदाम थंडाई पिण्याचे अनेक फायदे आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही बदाम थंडाई चवीला अतीशय स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. यामध्ये बदाम, पिस्ता, खसखस, बडीशेप, काळी मिरी, केशर आणि वेलदोडा यासारख्या दर्जेदार पदार्थांचा वापर करतो.
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर ठरणारी आहे. शरीर कमविण्यासाठी विशेषकरून वापरली जाणारी थंडाई लहान थोरांनाही आवडू लागली आहे. ही थंडाई पिल्याने शरीरातील थकवा नाहीसा होतो. तसेच अपचन आणि पोटाचे विकार नाहीसे होतात. या कारणामुळे आता कोल्हापूर वासीय राणादाची बदाम थंडाई पिण्यास गर्दी करू लागले आहेत. हा व्यवसाय अधिक वृद्धिंगत व्हावा या हेतूने त्याने आपल्या व्यवसायाची फ्रेंचाईज देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रा व्यतिरिक्त हार्दिक जोशी आता व्यवसाय क्षेत्रात देखील आपला चांगलाच जम बसवताना दिसत आहे. या व्यवसाच्या भरभराटीसाठी हार्दिक जोशीला मनःपूर्वक शुभेच्छा.