मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले अभिनेते अशोक समर्थ यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. नुकतेच जननी या चित्रपटाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये वर्ल्ड प्रीमियर साठी बहुमान मिळवलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात स्वतः अशोक त्यांची पत्नी शीतल पाठक समर्थ, डॉ मोहन आगाशे, उषा नाईक, देवेंद्र देव, ज्योती चांदेकर यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. २०१३ साली ट्रॅफिक जॅम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक समर्थ आणि त्यांची पत्नी शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते. शीतल पाठक या देखील मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत.
ट्रॅफिक जॅम चित्रपटात एकत्रित काम करत असताना इथूनच त्या दोघांची ओळख झाली होती आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपणही एक चित्रपट दिग्दर्शित करावा अशी या दोघांची ईच्छा होती. जवळपास सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वर्धमान पुंगलिया निर्मित ‘जननी’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ यांनी केले आहे. चित्रपटाचे शूटिंग बारामती येथे पार पडले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त अशोक समर्थ यांनी मनोगत व्यक्त केले आहे, पाहूया ते नेमके काय म्हणाले आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एक आनंददायी बातमी तुमच्या सोबत शेअर करतोय. अथक परिश्रमानंतर अभिनेता या नात्याने तुमच्या सोबत जोडला गेलो.
आता दिग्दर्शना मध्ये जननी या मराठी चित्रपटाच्या रूपाने तुमच्या सोबत जोडला जातोय. दिग्दर्शनाच्या पहिल्या पदार्पणातच जननी या माझ्या चित्रपटाचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पिफ इंडिया मध्ये वर्ल्ड प्रीमिअर साठीचा बहुमान मिळाला आहे. तेंव्हा ३ ते १० मार्च दरम्यान जननी चित्रपट पाहण्याची संधी आपणास मिळणार आहे. कोणत्याही दिग्दर्शकासाठी हा क्षण खूप मोलाचा असतो, मी पुणे इंटरनॅशनल फिल्म महोत्सवाचे आभार मानतो कि त्यांनी माझ्या जननी सिनेमाची निवड करून माझा आत्मविश्वास वाढवला आहे. आणि आपणा रसिक प्रेक्षकांचे पण मी आभार मानतो कि आपण माझ्या प्रत्येक यशात कालपर्यंत सोबत होतात.
आणि ईथून पुढे दिग्दर्शनाच्या प्रवासात पण मला सोबत कराल याची खात्री बाळगतो. माझ्या जननी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो कारण माझ्या या पहिल्या प्रयत्नात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. शेवटी माझे निर्माते मित्र वर्धमान पुंगलिया आणि माझी पत्नी शितल पाठक समर्थ तुम्हा दोघांच्या शिवाय हे पूर्णत्व शक्य नव्हते, तेंव्हा तुमचे खूप खूप आभार. वर्धमानजी अशा विषयाला हाथ घालणं सोपं नव्हतं पण ते तुम्ही केलंत, पुढील वाटचालीसाठी या मित्र परिवाराच्या साक्षीने आपणा सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद.