मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन विकास पाटील आणि विशाल निकमच्या मैत्रीमुळे खूप गाजला. कॅप्टन पदासाठी विशालला मत मिळावे म्हणून विकासला डोक्यावरील केस गमवावे लागले होते. त्याच वेळी विशालने देखील आपल्या डोक्याचे केस काढून टाकले. मैत्रीसाठी त्याग करणारा हा अनुभव बिग बॉसच्या घरात प्रत्यक्षात पाहताना अनेकजण भावुक झाले होते. त्यानंतर यांच्यात अधिक घट्ट मैत्री होत गेली. विकास बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये फायनलपर्यंत पोहोचला, मात्र तिसऱ्या क्रमांकवरच त्याला समाधान मानावे लागले होते. या शो नंतर विकास सध्या तरी कुठल्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाला नाही. त्याने आपल्या गावी एक टुमदार तितकेच आकर्षक घर बांधून आपल्या चाहत्यांचे लक्ष्य त्याकडे वेधलेले पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी आपल्या घराचे खास फोटो शेअर करत विकासने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विकास पाटील हा मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूर येथील गलगले हे त्याचं गाव. गावात त्याने आपल्या आई वडिलांसाठी टुमदार घर बांधले आहे. ‘कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला परंतु गावाशी जोडलेले नाळ कायम टिकून राहण्यासाठी घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजे निमित्ताने माझं कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं, छान वेळ देता आला. गाव आणि गावातील गोष्टींची बातच निराळी!’ असे म्हणत भावनिक मेसेज त्याने लिहिलेला पाहायला मिळाला. एका लाईव्ह व्हिडीओतून विकासने आपल्या गावाबद्दल तसेच घराबद्दल खूप काही बोलले आहे.
त्यात त्याने त्याच्या आई वडिलांचा आणि भाऊ विशाल याचा देखील परिचय करून दिलेला पाहायला मिळाला. आपलं गावी एक टुमदार घर असावं अशी विकासची मनापासून इच्छा होती. आणि ती पूर्ण झाली याचं समाधान खूप आहे असे तो या व्हिडिओत आवर्जून सांगताना दिसतो. सध्या विशाल आपल्या गलगले या गावी असून कुटुंबासोबत आनंद साजरा करताना दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनाही विकासचे घर खूप आवडले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळत आहे. शेतात बांधलेलं त्याचं हे टुमदार घर पाहणाऱ्याच्या नजरेत भरावं असंच आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने बांधलेल्या या घराची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते आहे. विकास पाटीलला अशाच भरघोस यशासाठी त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.