झी मराठी वाहिनीवर येत्या २० मार्च २०२२ पासून रात्री ८ वाजता ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. टीआरपी कमी मिळत असल्याने येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता काही दिवसातच गुंडाळली जात आहे. या मालिकेचा नुकताच शेवटचा भाग चित्रित झाला तेव्हा मालिकेतील कलाकारांनी भावनिक होऊन एकमेकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला. मालिका संपणार म्हटल्यावर आता वेगवेगळ्या पण तितक्याच सकारात्मक घडामोडी घडताना दिसणार आहे. एका घटनेमुळे स्वीटूवर असलेला मालविकाचा राग आता कमी होणार असून ती स्वीटूला आपलेसे करताना दिसणार आहे.
तर तिथेच मोहित सोबत घटस्फोट घेतल्यानंतर गायब झालेला मोहित मालिकेतून पुन्हा एकदा एन्ट्री घेताना दिसणार आहे. अर्थात त्याची एन्ट्री सकारात्मकच होणार असल्याने येत्या काही भागात सर्व काही आलबेल घडून आलेले पाहायला मिळणार आहे. मोहितचे विरोधी पात्र रंगवले आहे अभिनेता निखिल राऊत याने. मालिकेतील मोहितच्या भूमिकेमुळे निखिलला आणि अगदी त्याच्या पत्नीला देखील सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. परंतु त्याच्यासाठी ही मालिकेतील भूमिकेची पावतीच ठरली होती असे म्हणायला हरकत नाही. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात काम केलेल्या निखीलसाठी हा अनुभव मात्र खूप त्रासदायक ठरला होता. यासंदर्भात त्याने लिहिलेली पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती.
याच आठवणी जाग्या करत त्याने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो की, अखेर येऊ कशी तशी मी नांदायला या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं. गेली २० वर्ष मी या क्षेत्रात काम करत आहे, आजपर्यंतची ही माझी २५ वी मालिका. खरं तर माझं पात्र ‘मोहित’ हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं. परंतू मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं प्रेक्षकांना वाटत होतं. मला देखिल ते आवडलं असतं परंतू कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी, चाहत्यांनी ह्या मालिकेतील खलनायक असलो तरीही माझ्या मोहित या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं त्या बद्दल मनापासून आभार.
तसंच या मालिकेत काम करण्याची संधी दिल्या बद्दल ट्रम्प कार्ड प्रोडक्शन निर्माते तेजेंद्र नेसवणकर, सुवर्णा रसिक राणे आणि झी मराठी वाहिनीचे निलेश मयेकर सर. सोजल सावंत, रेणुका जोशी, सिद्धार्थ मयेकर संपूर्ण झी मराठी वाहिनीचेही मनापासून आभार. सर्व लेखक तसेच, दिग्दर्शक अजय मयेकर सर, हरिष शिर्के सर, डायरेक्शन आणि प्रोडक्शन टीम, श्याम सोनलकर, हेमंत सोनावणे, मुकेश कलंके, अनिकेत झेले, शैलेश पटेल, माझे स्पॉट बॉय मित्र आणि माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे पण खूप खूप आभार. तुमच्या सगळ्यांमुळे मोहित हे पात्र साकारता आलं.