Breaking News
Home / जरा हटके / अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट
ashok saraf nivedita saraf
ashok saraf nivedita saraf

अशोकमामांनी तब्ब्ल ४६ वर्षांपासून जीवापाड जपली आहे एक भाग्यशाली गोष्ट

मराठी सिनेमातील एक खळखळून हसवणारं रसायन म्हणजे अशोक सराफ. इंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. त्यांच्या बोटात एक अंगठी आहे, साधीशीच चांदीची. नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही काढलेली नाही. याचं कारण म्हणजे त्यांच्यासाठी ही अंगठी लक फॅक्टर आहे. आपली एखादी वस्तू मंगलप्रद असावी हे अगदी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत असतं. तसेच ते अशोक मामांच्या बाबतीतही आहे. त्यांचा विजय लवेकर नावाचा एक मित्र मेकअपमन म्हणून काम करायचा.

ashok saraf nivedita saraf
ashok saraf nivedita saraf

त्याचं चांदीकाम व सराफाची छोटी पेढी होती. एकदा त्याने बनवलेल्या काही अंगठ्या घेऊन तो स्टुडिओत आला. अशोकमामांना त्यातली एक अंगठी सिलेक्ट करायला दिली, मामांनी हाताला लागणारी पहिलीच अंगठी घेतली आणि अनामिकेत चढवली. अगदी सोनाराकडे माप देऊन बनवावी इतकी ती मामांच्या बोटात सहजपणे आली. त्यावर नटराजाची प्रतिमा कोरली होती. अंगठी बोटात घालून तिच्याकडे निरखून पाहत अशोक मामा विजयला म्हणाले की आता ही अंगठी माझी. अंगठी मामांना आवडली आणि बोटात बसली इथपर्यत तो विषय तिथे संपला होता खरंतर. पण त्यानंतर तीन दिवसांनी असं काहीतरी झालं की त्या चांदीच्या अंगठीविषयी अशोकमामांच्या भावनाच बदलून गेल्या.

ashok mama lucky ring
ashok mama lucky ring

तोपर्यंत अशोक मामांची कारकीर्द चाचपडत सुरू होती. अंगठीचा किस्सा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अशोक मामांना पांडू हवालदार या सिनेमाची ऑफर आली. या सिनेमाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नवीन सिनेमांची आणि ते सिनेमे बॉक्सऑफीसवर हिट होण्याची घोडदौड सुरूच राहिली. हा किस्सा सांगताना अशोकमामा असंही म्हणतात की श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण ही अंगठी बोटातून काढायचीच नाही असं मी ठरवलं. गंमत म्हणजे, एकदा एका सिनेमात अशोकमामांना भिकारीची भूमिका करायची होती. रस्त्यावर बसून हात पसरून भीक मागताना हातातील ती ठसठशीत अंगठी कॅमेऱ्यात खुपायला लागली.

अंगठी तर काढायची नाही आणि भिकारीच्या भूमिकेला तर न्याय द्यायचा असा प्रश्न जेव्हा अशोकमामांपुढे उभा राहिला. तेव्हा त्यांनी अंगठीवरचा नटराज प्रतिमा असलेला जाडभाग तळहाताकडे वळवला आणि नुसती रिंग वरच्या बाजूला केली. यामुळे प्रश्नही सुटला आणि अंगठी बोटावेगळीही झाली नाही. थोडक्यात काय, अशोकमामांची ही अंगठी म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. जेव्हा निवेदिता यांच्यासोबत अशोक मामांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा निवेदिता यांनी सोन्याची अंगठी भेट दिली. लग्नानंतरच्या काही दिवसात ती सोन्याची अंगठी मामांनी हरवली, पण गेल्या ४६ वर्षापासून बोटात असलेली चांदीची लकी अंगठी मात्र अशोकमामा आजही जीवापाड जपतात.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.