नागराज मंजुळे सारखा गांवखेड्यातला पोरगा एक सिनेमा करतो भावांनो. त्या एका सिनेमातनं त्यो मराठीत गेली पंध्रावीस वर्ष सिनेमा करत असलेल्या तमाम दिग्दर्शकांना लै लै लै मागं टाकून एकशेवीसच्या स्पीडनं फुडं निघून जातो. कसं साधलं आसंल हो हे? त्यानं एक अशी कलाकृती निर्मान केली, की जी बघुन तुमचं मनोरंजन तर झालंच, पन तुमच्या मेंदूला झिनझिन्याबी आल्या. आपल्या आसपास बघून, आपन दुर्लक्षित केलेलं वास्तव लै बेक्कार अंगावर आलं. फुढच्या पिढीतल्या दिग्दर्शकांसाठी एक बेंचमार्क सेट केला त्यानं. जे आजपर्यन्त कुनीच केलं नव्हतं. नंतर वरवरची नक्कल करनारे ग्रामीन सिनेमे आनि लव्हश्टोर्या लै आल्या. पन नागराजचा गाभा ते पकडू शकले न्हाईत.
ह्या यशाचं रहस्य काय? एकच कारन नागराजनं सोत्ता भोगलेलं, सोसलेलं, अनुभवलेलं जगनं आपल्यासमोर कलात्मक रीतीनं मांडलं! ते मांडन्याआधी त्यानं सिनेमाच्या तंत्राचा, बारकाव्यांचा, चित्रभाषेच्या ताकदीचा सखोल अभ्यासबी केला. त्यो तांत्रीक अभ्यास हल्ली कुठंबी कुनालाबी शिकायला मिळतो. पन छोट्या खेडेगांवात, शाळा शिकत डुकरं सांभाळनारा, खोपटात र्हानारा, एक वडार समाजातला हुशार संवेदनशील पोरगा, मोठा होऊन ते सिनेमाचं तंत्र शिकतो. तवा त्या शिक्षनाला धार येते. विशेष म्हन्जी, हे तंत्र शिकताना, ल्हानपनी वर्चस्ववादी गावभाड्यांनी अय् फॅंड्री अशी हाक मारून काळजावर मारलेला दगड त्यो इसरलेला नसतो.
ती जखम अजून ताजीच असते. आता कॅमेर्याचं तंत्र शिकून त्यो त्या हेटाळणीरूपी दगडाला आपल्या कलाकृतीतनं उत्तर द्यायच ठरवतो. निव्वळ त्यामुळंच भावांनो, ती कलाकृती एवढी महान ठरते! आपन लोकांसमोर जे मांडतो, ते आपन सोत्ता अनुभवलेलं आसंल तर ते जास्त खोलवर आनि दीर्घकाळ घुसनारा परीनाम देतं. तुकोबारायाचे अभंग अजरामर व्हायचं कारनबी नेमकं हेच होतं. त्याच्या अभंगाच्या नकला त्याकाळात लै जनांनी करून तुकोबारायासारखं फेमस शेलीब्रीटी होन्याचा ट्राय मारलावता. आपन सोसलेली वेदना तो अभंगरूपात मांडत होता. माझ्या स्वतःच्या अनुभवातनं जे आलं आहे, तेच मी जगाला देत असतो, सांगत असतो.
माझं बोलणं म्हणजे निव्वळ वरवरची कोरडी पोपटपंची नाही. माझ्या बोलण्याच्या मूळाशी माझ्या अंतरातला काळजातला रसरशीत ओलावा आहे! मी जे बोलतो ते अनुभवाच्या, सत्याच्या, शुद्धतेच्या कसाला लावून उतरले आहे, सिद्ध झाले आहे. चारशे वर्षांनंतरबी तुकोबारायाचे अभंग आपन आजच्या काळाशी जोडू शकतो, ताजेतवाने वाटत्यात ह्याचं मूळ कारन हेच हाय राजेहो! आधीच वर्चस्ववादी व्यवस्थेनं अडानी जनतेला अंधश्रद्धांच्या जाळ्यात अडकवलं होतं. देवाधर्माच्या, कर्मकांडाच्या नावावर त्यांचं शोषन चालवलं होतं. त्यात परत आपन वरवरचं ग्यान पाजळनं म्हंजी जनतेला आगीतनं फुफाट्यात ढकलनं. तुकोबारायाच्या काळातबी सर्वसामान्यांना भरकटवनार्या अनेक गोष्टी भवताली होत्या.
सर्वसामान्य कष्टकर्यांबद्दल, शोषित पीडितांबद्दल तुकोबाराया हळवा होता. अंतरात ओल होती. म्हनून कस नांवाच्या दगडाला लावून सोनं पारखलं जातं, तसं आपलं जगनं त्यानं अनुभवाच्या कसाला लावलं. मग फूल्ल काॅन्फीडन्सनं छाती ठोकून सांगीतलं, मी सांगतोय त्यासारखं सत्य तुम्हाला जगात सापडनार नाय! चारशे वर्षांपूर्वी त्यानं सोत्ताचा जीव पनाला लावून आपल्याला तळमळीनं आयतं ग्यान दिलंय, फुकट. आपल्याला अनुभव घ्यायची गरज नाय. फक्त त्यानं ल्हीलेलं समजून घ्यायचंय आनि स्वच्छ नजरेनं जगाकडं बघायचंय. यवढं सोपं हाय, तरीबी आपल्याला ते ग्यान घेता यिना राव. अजून आपन त्याच दलदलीत खितपत पडलोय. आता तरी सुधरूया रे भावांनो, किरण माने.