स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या रेसमध्ये अग्रेसर राहिलेली पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत दिपाने एक व्यवसाय सुरू केला आहे ज्यात घरगुती बनवलेल्या पदार्थांचा समावेश असणार आहे. या व्यवसायाचे उदघाटन होत असताना सौंदर्याने दिपाचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. दिपाची ही भरारी पाहून मात्र आयेशाचा जळफळाट झालेला असतो ही बातमी आयेशा कार्तिकला सांगते. कार्तिक मात्र दिपाच्या या यशाबद्दल विचार करू लागतो आणि यूएसला जाण्याच्या तयारीला लागतो. मात्र कार्तिक परदेशात गेल्यावर एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचे दिसून येते.
मालिकेत हा ट्विस्ट येईल तेव्हा येईल. मात्र इकडे मालिकेत कार्तिकची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष गोखले याच्या पायाला खऱ्या आयुष्यात नुकतीच एक दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. आशुतोष गोखले याला दुखापत झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना कळाली होती. त्यावरुन अनेकांनी त्याची विचारपूस देखील केली. अनेकांचे फोन कॉल्स येऊ लागले. अनेकांनी माझ्या तब्येतीची चिंता व्यक्त केली मात्र ही दुखापत गंभीर नसल्याचे त्याने त्याच्या चाहत्यांना कळवले आहे. तरीही अनेकांचे भरभरून विचारपूस करणारे मेसेजेस येऊ लागल्याने, अखेर ही दुखापत झाल्याची बातमी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्यात डाव्या पायाच्या गुडघ्याला मार लागला असल्याचे त्याने सांगितले आहे.
पुढचे ४ आठवडे तरी किमान मला ही काळजी घेऊन गुडघ्याला बेल्टचा आधार द्यायचा आहे. परंतु यात काळजी करण्याची गरज नाही कारण मी चालू शकतो, बसू शकतो आणि पोज देखील देऊ शकतो आहे. मी रंग माझा वेगळा या मालिकेचे शूटिंग थांबवणार नाही आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील सक्रिय असणार आहे. आज ५ फेब्रुवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली आणि उद्या ६ फेब्रुवारीला विष्णुदास भावे, वाशी येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत. तसेच पुढेही आमचे प्रयोग असणार आहेत. त्यामुळे दुखापत झाली असली तरी मी त्याच उत्साहाने तुमच्यासमोर दाखल होणार आहे असे तो म्हणतो. दुखापत गंभीर नसल्याने मला व्यवस्थित चालता येत असल्याचे त्याने कळवले असल्याने त्याच्या चाहत्यांनी आता निश्वास टाकलेला पाहायला मिळतो आहे.