अभिनेता प्रसाद ओकने मराठी चित्रपट सृष्टीतील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिका निभावणारा प्रसाद बंदिनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर झळकला होता. दामिनी, असंभव, पिंपळपान, आभाळमाया, अवघाची संसार, वादळवाट, होणार सून मी ह्या घरची, फुलपाखरू अशा अनेक दर्जेदार मालिकेतून प्रसाद महत्वाच्या भूमिका निभावताना दिसला. हिरकणी, फुल धमाल, धुरळा, पिकासो, फर्जंद असे अनेक चित्रपट त्याने अभिनित केले. शिवाय हिरकणी, कच्चा लिंबू आणि आगामी चित्रपट चंद्रमुखी यांचे दिग्दर्शनही केले.
त्याच्या यशाचा हा प्रवास त्याची पत्नी मंजिरीने देखील जवळून अनुभवला आहे. मंजिरीला अभिनयाची आवड असल्याने सदानंदच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी प्रसाद एका नाटकासाठी मंजिरीला शिकवत होता. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. गंमत म्हणजे या दोघांमध्ये कुणीही कुणाला प्रपोज केले नव्हते. मात्र आयुष्यभराचे जोडीदार होऊ शकतो, हे दोघांना उमगले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. नुकतेच त्यांच्या लग्नाला २४ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने दोघांनी पोस्ट वेडींग व्हिडीओ बनवून लग्नाच्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. हल्ली प्रिवेडिंग व्हिडीओ प्रचलित होत आहेत, मात्र आम्ही पोस्ट वेडिंग शूट करून शुभेच्छा देत आहोत.
असे पहिल्यांदा घडत असावे असे प्रसाद म्हणाला होता. एकीकडे प्रसाद महाराष्ट्राची हास्यजत्रा असो नाहीतर दिग्दर्शन क्षेत्रात व्यस्त असतो. मंजिरी देखील अनेक कपड्यांचा आणि ज्वेलरीच्या ब्रॅण्डसाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता मॉडेलिंग करताना दिसत असते. यातून मंजिरीला आता नुकतीच एक ओळख मिळाली आहे. नुकतेच तंतुह या ब्रँड अंतर्गत तिच्या स्वतःच्या नावाने ओळखली जाणारी मंजिरी नथ सादर केली आहे. संक्रांती स्पेशल मंजिरीच्या नावाने नथ बाजारात आली असल्याने ती खूप खुश आहे. याबाबत तिने लिहिले कि, “छोट्या छोट्या उद्योजकांना माझ्याकडून छोटीशी मदत व्हावी या उद्देशानी मी कोलॅबोरेशन सुरु केलं. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय, आज एका नथीला माझं नाव दिलं गेलंय मंजिरी नथ.
लोकांच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून मी प्रयत्न केले, करत राहीनच. पण आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान सुद्धा आहे. मंजिरीच्या या यशावर प्रसादने तिच्याविरोधात बोलणाऱ्याला कानपिचक्या दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, प्रिय मंजू आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशाने तू हे काम सुरु केलंस. या निरपेक्ष हेतूचं फळ म्हणूनच आज तुझं नाव लागलंय. आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली. तुझ्या जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत, या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस. याचा खूप अभिमान वाटतोय खूप खूप प्रेम.