अगडबम या चित्रपटामधून सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांच्या सोबत अभिनेत्री तृप्ती भोईर हिने नाजूका साकारली होती. तिने साकारलेली नाजूका खूपच प्रसिद्धी मिळवताना दिसली. या चित्रपटाच्या यशानंतर २०१८ साली माझा अगडबम हा चित्रपट तिने प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या चित्रपटाचे तिने दिग्दर्शन केले आणि अभिनय देखील साकारला होता. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तृप्ती राज्यनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. इथूनच सही रे सही या व्यावसायिक नाटकात पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. वादळवाट, चार दिवस सासूचे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, टुरिंग टॉकीज अशा चित्रपट मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. यातील काही चित्रपटांचे तिने दिग्दर्शन देखील केलं आहे.
याशिवाय नृत्य कलेचे प्रशिक्षणही तिने घेतले होते. जुलै २०१७ साली तृप्तीने दाक्षिणात्य संगीतकार टी सतीश चक्रवर्ती याच्यासोबत लग्नगाठ बांधली. सतीश चक्रवर्ती यांनी दाक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिलं आहे. याशिवाय ऐ आर रेहमान यांच्यासोबतही त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती. गेल्या काही काळापासून तृप्ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. मधल्या काळात त्यांनी आदिवासी महिलांना सक्षम बनवण्यासाठी एक संस्था उभारली आहे. ‘शेल्टर फाऊंडेशन’ या संस्थेअंतर्गत हस्तकला रोजगार प्रकल्प आयोजित केले आहेत. यात आदिवासी महिलांना बांबू पासून वस्तू बनवणे, लेपन आर्ट सारख्या हस्तकला शिकवल्या जात आहेत. हे शेल्टर उभारण्यामागचा मुख्य हेतू गावातील महिलांना रोजगारासाठी गावाबाहेर जाता येऊ नये हा होता. गावातच त्यांना या शेल्टर मार्फत रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जेणेकरून ही कला शिकून त्यांना आर्थिक साधन उपलब्ध होईल. महिला शिकली की त्यांच्या कुटुंबाला देखील हातभार लागेल, असे तृप्ती भोईर यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी खेडोपाडी रोगराईला लोकं घाबरत होती. तृप्ती भोईर यांनी पालघर मधील गावागावात जाऊन जनजागृती केली, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील गांजे ढेकाळे गावी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पहिलं वहिलं शेल्टर उभारलं. ३० डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी उभारलेल्या फाऊंडेशन अंतर्गत पहिल्या शेल्टरचे उदघाटन करण्यात आले. या शेल्टरमधून जवळपास १०० महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. या यशानंतर महाराष्ट्रात असे आणखी बरेचसे शेल्टर उभारले जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे तृप्ती भोईर यांचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.