माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यश आणि नेहाची लव्हस्टोरी लवकरच एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यांची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील पाहायला आवडत आहे. आज ५ जानेवारी रोजी प्रार्थनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिची रिअल लाईफ लव्हस्टोरी प्रेक्षकांना देखील जाणून घेण्याची उत्सुकता आहे. प्रार्थनाने १४ नोव्हेंबर २०१७ साली अभिषेक जावकर सोबत मीडियाला कुठलीही खबर न देता लग्नगाठ बांधली. त्यामुळे अभिषेक आणि प्रार्थना एकमेकांना कधी भेटले हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये होती. अभिषेक जावकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे, दोघांचे हे अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाच्या मैत्रिणीच्या आईने हे स्थळ तिला सुचवलं होतं. त्यावेळी उद्या भेटणार म्हणून आधल्या दिवशी फोनवर प्रार्थना आणि अभिषेकचं बोलणं झालं होतं.
रविवारी संध्याकाळी शूटिंग असल्याने आपण दुपारी भेटू असं अभिषेकने प्रार्थनाला सुचवलं. प्रार्थनाने तिच्या आईला हे कळवलं आणि दोन तासात परत येईल असं सांगितलं. साडे चार वाजता आईचा फोन आला तरीही प्रार्थना अभिषेक सोबत गप्पाच मारत बसली होती. दुपारी १ वाजता त्या दोघांची भेट झाली होती आणि ६ वाजेपर्यंत ते एकमेकांशी गप्पा मारत राहिले. यादरम्यान प्रार्थनाने खूप सारे पॅनकेक्स आणि जवळपास २ किलो बटर खाल्ले होते. जुलै महिन्यात २ तारखेला ही भेट झाल्यानंतर साधारण चार महिन्यांनी म्हणजे १४ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. अभिषेकला रिअलाईज झालं की आपण प्रार्थनाच्या प्रेमात पडलोय. त्यावेळी त्याने प्रार्थनासाठी एक कविता लिहिली होती आणि ती गाऊन दाखवली होती आणि लग्नासाठी प्रपोज केलं होतं. प्रार्थनाचा दिलखुलास स्वभाव अभिषेकला खूपच भावला होता, तर प्रार्थनाला देखील अभिषेक पहिल्याच भेटीत आवडू लागला होता.
त्यानंतर मीडियाला कुठलीही बातमी न देता प्रार्थनाने अभिषेक सोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून प्रार्थना प्रेक्षकांसमोर आली होती. त्यानंतर मितवा, कॉफी आणि बरंच काही, फुगे, लग्न मुबारक, फुगे, व्हाट्स अप लग्न, ती आणि ती. मिस्टर मिसेस सदाचारी, मस्का, अजिंक्य अशा मराठी चित्रपटातून मुख्य भूमिका साकारताना दिसली. प्रार्थना बेहरेची हसण्याची स्टाईल तमाम प्रेक्षकांना खूप ओळखीची झाली आहे. तिच्या केवळ हसण्यावरूनच ही प्रार्थना बेहरे आहे अशी ओळख तिला मिळाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मराठी मालिकेतून ती प्रथमच मराठी सृष्टीच्या छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहे. प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे. आज ५ जानेवारी रोजी प्रार्थनाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तिला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.