महाराष्ट्राची माय अशी ओळख मिळालेल्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराचा झटका आल्याने पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज अनाथांची माय अनेकांना पोरकी करून कायमची निघून गेली, अशा शब्दात त्यांच्याप्रती भावना व्यक्त होत आहेत.
महाराष्ट्रातील मदर टेरेसा अशीही एक ओळख त्यांना मिळाली आहे. त्यांचा जीवनप्रवास सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळाला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांच्या आई वडिलांच्या तिचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव या गावी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. त्यामुळे जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले.
वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांचे वयाने मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला होता. यातूनच त्यांनी हजारो अनाथांना आश्रय दिला होता. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना काही दिवसांपूर्वीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हर्नियाच्या त्रासामुळे नुकतेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सिंधुताई सपकाळ यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.