आज २७ डिसेंबर रोजी अभिनेता सलमान खानचा ५६ वा वाढदिवस आहे. सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्यासोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ‘वयाच्या ५ व्या वर्षांपासून मी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रवासात मला सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली’ असे म्हणत या कलाकाराने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सलमान खान सोबत फोटोतला हा मराठमोळा चिमुकला तुम्ही ओळखला असेलच. हा चिमुकला आज मराठी सृष्टीत अभिनेता आणि निर्माता म्हणूनही ओळखला जातो. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याचे नाव आहे पुष्कर जोग. पुष्कर हा मराठी तसेच हिंदी चित्रपटातही झळकला आहे. अभिनयासोबतच त्याने निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. मराठी विग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये त्याने हजेरी लावली होती, त्यावेळी तो रनरअप ठरला होता.
दादा कोंडके यांच्या वाजवू का या चित्रपटात तो बाळकृष्णच्या भूमिकेत दिसला होता. शाळेत असताना तो वेगवेगळ्या मंचावर डान्स सादर करत असे इथूनच अभिनयाची त्याला संधी मिळत गेली. पुष्कर हा डेंटिस्ट आहे, मात्र अभिनयाची आवड असल्याने यातच करिअर करायचं स्वप्न त्याने पाहिलं. जबरदस्त या मराठी चित्रपटातून प्रथमच तो नायकाच्या भूमिकेत झळकला होता. हिंदी चित्रपट आणि मालिकेतून देखील तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता. तुक्या तुकविला नाग्या नाचविला, मिशन पॉसिबल, धूम टू धमाल, थोडं तुझं थोडं माझं, ऐसी भी क्या जलदी है, जाना पेहचाना, हम दोनो, वेल डन बेबी अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून तो महत्वाच्या भूमिकेत झळकला आहे. तू तू मै मै, हद कर दि या हिंदी मालिकेतूनही तो प्रेक्षकांसमोर आला होता. या प्रवासात दादा कोंडके, ऋषी कपूर, सलमान सोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे.
सलमान सोबत एका म्युजिक शोमध्ये पुष्करला डान्स करण्याची संधी देखील मिळाली होती. त्यावेळी मी अवघ्या ५ वर्षांचा होतो, हीच आठवण सांगून त्याने सलमान खानला त्याच्या वाढदिवसदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. विराजस कुलकर्णी याचे दिग्दर्शन असलेल्या व्हिक्टोरिया या आगामी चित्रपटात पुष्कर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो सोनाली कुलकर्णी सोबत सहनायकाची भूमिका बजावणार आहे. सोनाली सोबत त्याने अगोदर दोन चित्रपट साकारले होते व्हिक्टोरिया हा सोनाली सोबतचा त्याचा तिसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. विराजस कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे याअगोदर त्याने काही नाटकांचे दिग्दर्शन केले होते. तर आई मृणाल देवसोबत रमा माधव या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे व्हिक्टोरिया हा दिग्दर्शक म्हणून केलेला पहिला वहिला चित्रपट विराजससाठी तितकाच महत्वाचा ठरणार आहे.