काल बिग बॉसच्या घरातून मीरा जगन्नाथ एलिमीनेट होऊन बाहेर पडली. इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला फायनलमध्ये जायचं आहे, असे मिराने तिचे मत व्यक्त केले होते. परंतु तिचे हे स्वप्न अपुरेच राहिले. बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मीराचे आई वडील तिच्याशी कित्येक वर्षांपासून बोलत नाहीत, असा तिने खुलासा केला होता. त्यामुळे माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून तिने इतर सदस्यांविरोधात गोंधळ घातला होता. परंतु मीराला भेटण्यासाठी फक्त तिचा भाऊ आला होता. त्यावेळी मिराला आपले अश्रू अनावर झाले होते.
मीरा तिच्या आई वडिलांसोबत का बोलत नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला होता. पण बिग बॉसच्या शो मुळे मिराचे आई वडील पहिल्यांदाच समोर आले आहेत. बिग बॉसमुळे हा सर्व क्षण अनुभवताना मिराच्या आईवडिलांनी तिच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे की, मिराला आम्ही मुंबईत घ्यायला जाणार आहोत. मीराबद्दल मला अभिमान आहे खूप गर्व आहे मला, कारण ती बिग बॉसमध्ये एवढे दिवस राहिली ती फार मोठी गोष्ट आहे. २०१५ साली ती मुंबईला गेली होती तेव्हा तिच्या आईलाही वाटत होतं की ती जे काही करतीये त्याला सपोर्ट करावा. पण असं मी काहीच करू शकले नाही. तिचे बाबा काहीच बोलायचे नाही त्यामुळे मी पण जास्त सपोर्ट केला नव्हता. तिला जर लहानपणापासूनच सपोर्ट केला असता तर खूप पुढे गेली असती. काल एवढी लोकं आली होती, तेव्हा ही तुमचीच मुलगी आहे का ? म्हणून सगळेजण विचारायचे, माझं मन त्यावेळी खूप भरून आलं होतं.
मिराबद्दल विचारलं तर मला इतका आनंद होतो की माझी मुलगी एवढी मोठी झाली की माझ्या डोळयातून अश्रू येतात. आम्ही एक दिवसपण तिची आठवण काढल्याशिवाय राहत नव्हतो, बिग बॉसमुळे आम्ही रोज तिला पाहत होतो. मी मिराला थँक यु म्हणेन, कारण तिच्यामुळे आज मला ओळखतात मिराचे बाबा म्हणून. ती फायनलमध्ये नाही गेली तरी ती आमच्यासाठी विनरच आहे. ती ट्रॉफी जिंकू अथवा न जिंकू. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना तिच्या आई वडिलांनी दिलेली ही प्रतिक्रिया मीरासह घरातील सर्वांना रडवुन गेली होती. मिराच्या जन्मावेळी मुलगाच व्हावा अशी तिच्या आजीची अपेक्षा होती. मात्र मुलगी झाली असली तरीदेखील तिचे पालनपोषण तिच्या घरच्यांनी मुलाप्रमाणेच केले होते. त्यामुळे सुरुवातीपासून मीरा एक टॉम बॉय म्हणूनच ओळखली जायची.
तिचा याच गेटअपमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा तिला ट्रान्सजेंडर असल्याचे अनेकांनी म्हटले होते. लोकांनी दिलेल्या कमेंट्समुळे मिराला नाहक त्रास सहन करावा लागला होता. मिराने यावर उत्तर दिले होते की, मी ट्रान्सजेंडर नाही तर मी मुलगीच आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना तिने प्रतिक्रिया दिली. मी ह्या घरात राहून खूप काही शिकले आहे. माझे बाबा खूप प्रेमळ पण तितकेच कठोर आहेत आज ते जे काही माझ्याबद्दल बोलले की ‘तुझ्या नावाने आज लोकं ओळखतात’ ह्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही माझ्यासाठी.