मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्रीचा म्हणजेच, हृता दुर्गुळे हिचा आज शुक्रवारी २४ डिसेंबर २०२१ रोजी साखरपुडा संपन्न झाला आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एन्ड या ठिकाणी हृता आणि प्रतिकचा साखरपुडा संपन्न होत आहे. या खास क्षणाची हृताने खूप अगोदरच तिच्या चाहत्यांना कल्पना दिली होती. मेहंदीचे सजवलेला एक रील तिने हिंट म्हणून शेअर केला होता. त्यावरून ती लवकरच लग्न करणार असे अंदाज बांधण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी हृता दुर्गुळे हिने प्रतीक शाह सोबतचा आपला एक फोटो शेअर केला होता आणि त्याच्या प्रेमात असल्याचे जाहीर केले होते. प्रतीक ने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर हृतासोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती. तिच्या या बातमीनंतर महाराष्ट्रातील अनेक तरुणांची मनं दुखावली असल्याचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. अर्थात हृता महाराष्ट्राची क्रश असल्याने अनेकांची मनं दुखावणार अशी कल्पना प्रतिकने अगोदरच केली होती त्यावरून त्याला धमक्या येतील असेही त्याला वाटले होते मात्र त्यानंतर उलट आम्हाला लोकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यांच्याकडून भरघोस शुभेच्छा मिळाल्या होत्या असे प्रतिकने एका मुलाखतीत म्हटले होते.
हृता दुर्गुळे साखरपुड्यानंतर उद्यापासून दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या दौऱ्यावर असणार आहे.
त्यामुळे तिचा हा व्यस्त शेड्युल ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या भावाचा देखील लग्नसोहळा संपन्न झाला होता. या लग्न सोहळ्यात हृताच्या सासरच्या मंडळींनी देखील हजेरी लावली होती. प्रतिकने ‘परफेक्ट फॅमिली’ असे म्हणत हृताच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले होते. हृताची होणारी सासू मुग्धा शाह या देखील अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी चित्रपटात देखील काम केलं आहे तसेच हिंदी मालिकांमधून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. तर प्रतीक शाह हा दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले असून एक तरुण दिग्दर्शक म्हणून त्याच्या या कामाचं हिंदी मालिका सृष्टीत नेहमीच कौतुक करण्यात आलं आहे.