२०११ साली ‘देईवा थिरुमगल’ हा तामिळ भाषिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा नायक कृष्णा हा मानसिक रित्या विकलांग होता. शरीराने व्यवस्थित वाढ होत असलेला कृष्णा मात्र ५ वर्षाच्या मुलाच्या बुद्धीसारखा वागायचा. पत्नीच्या निधनानंतर तो आपल्या मुलीचे म्हणजेच निलाचे पालनपोषण करायचा. नीला ही आपल्या बहिणीचीच मुलगी असल्याचे समजताच तीची मावशी निलाला कृष्णाकडे ठेवण्यास तयार नव्हती. याच भानगडीत असताना एका कोर्टात बाप लेकीच्या सुंदर नात्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आजही व्हायरल होताना दिसतो. या व्हिडिओतून नीला आपल्या बापाला जेवलास का? तुला बरं वाटतंय का? याची चौकशी करताना दिसते. दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमने या चित्रपटात कृष्णाची भूमिका अतिशय सुरेख निभावली आहे.
त्याच्या तोडीस तोड चिमुकलीच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले आहे. आज ह्या चिमुकली बद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. चित्रपटातली ही चिमुकली आज लोकप्रिय चाईल्ड आर्टिस्ट असून हिंदी चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या चिमुकलीचे नाव आहे “सारा अर्जुन”. १८ जून २००५ रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. सारा अर्जुन हिचे वडील राज अर्जुन हे देखील हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. थलाईवी, ब्लॅक फ्रायडे, रावडी राठोड, सत्याग्रह, शेरशहा, कालो या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. सारा आपल्या कुटुंबासोबत मॉलमध्ये गेली असताना, तिथेच तिला जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती. वयाच्या ४ थ्या वर्षीच साराने जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले होते. अगदी मॅकडोनाल्ड सारख्या जवळपास १०० हुन अधिक जाहिरातीं मधून एक बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली.
वयाच्या ६ व्या वर्षी ‘देईवा थिरुमगल’ हा तमिळ चित्रपट तिने अभिनित केला. या चित्रपटासाठी साराने तमिळ भाषा शिकली होती. विशेष म्हणजे स्वतःच्या डायलॉग सोबत साराने विक्रमचेही डायलॉग पाठ केले होते. शूटच्या वेळी विक्रमला ती त्याच्या डायलॉगची आठवण करून द्यायची. साराने निभावलेली नीला प्रेक्षकांना खूप भावली होती. या चित्रपटानंतर एक थी डायन, जय हो, शिवम, जज्बा, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, सांड की आँधी अशा तमिळ, मल्याळम तसेच हिंदी चित्रपटातून ती एक बालकलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर आली. तिचा आणखी एक आगामी तमिळ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यात ती नंदिनीच्या बालपणीची भूमिका निभावताना दिसणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत सारा अर्जुन एक प्रतिभावंत कलाकार म्हणून आता बरीचशी स्थिरावलेली पाहायला मिळते. पुढे जाऊन सारा नायिकेच्या भूमिकेत चमकावी अशी एक सदिच्छा आहे.