सिंघम, सिंबा, शेरसिंग, गली गली चोर है अशा अनेक चित्रपटातून सहाय्यक तर कधी खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याचे नाव आहे अशोक समर्थ. अशोक समर्थ हा कलाकार मूळचा बारामतीचा. बारामती येथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तर पुढील शिक्षण त्याने पुण्यातून पूर्ण केले. पुण्यात शिक्षण घेत असताना नाट्यसृष्टीशी त्याचा परिचय झाला. अभिनयाची गोडी पुढे त्याला मुंबईला घेऊन आली. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून त्याचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. त्यानंतर लक्ष्य या लोकप्रिय मालिकेतून एसीपी अभय कीर्तिकर ही दमदार भूमिका त्याला मिळाली.
आपल्या अभिनयाने अशोकने ही भूमिका तितक्याच सहजतेने निभावली. जवळपास ५ वर्षे चालणाऱ्या या मालिकेतून अभय कीर्तिकर ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात त्याने चांगलीच वठवली. पुढे त्याने आपली पावलं हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवली. इंसान हा पहिला हिंदी चित्रपट त्याला सकरण्यास मिळाला. रोहित शेट्टी च्या सिंघम या चित्रपटातील शिवा नायकच्या भूमिकेने अशोकला अमाप प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील त्याच्या वाट्याला आलेले डायलॉग देखील तुफान हिट झालेले दिसले. रावडी राठोड, सिंबा, गली गली चोर है, सत्या २, आर राजकुमार, शेरसिंग अशा दमदार चित्रपटातून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपट सृष्टी प्रमाणे अशोकने बार्डो, बेधडक, दंडीत, बकाल, विट्टी दांडू हे मराठी चित्रपट देखील गाजवले. २१ फेब्रुवारी २०२० रोजी अशोक समर्थने अभिनेत्री शीतल पाठक सोबत लग्न केलं. शीतल पाठक ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. मिलिंद गवळी यांच्यासोबत कृपासिंधू या चित्रपटात ती महत्वाची भूमिका साकारताना दिसली.
यासोबतच चेहरा, मंडळी तुमच्यासाठी कायपण, गाव माझं तंटामुक्त, बाय गो बाय, तात्या विंचू लगे रहो, सामर्थ्य या मराठी चित्रपटात शितलने मुख्य भूमिका साकारली आहे. जो भी होगा देखा जायेगा या मराठी नाटकातून व्यावसायिक नाटकात पदार्पण झालं होतं. २०१३ साली ट्रॅफिक जॅम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अशोक समर्थ आणि शीतल पाठक मुख्य भूमिकेत झळकले होते. इथूनच त्या दोघांची ओळख झाली होती. आपणही एक चित्रपट दिग्दर्शित करावा अशी या दोघांची ईच्छा होती. जवळपास सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वर्धमान पुंगलिया निर्मित ‘जननी’ या आगामी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक समर्थ याने केले आहे. चित्रपटाचे शूटिंग बारामती येथे पार पडले आहे. हा चित्रपट आता जवळपास पूर्ण होत आहे, त्यामुळे लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे. या चित्रपटात स्वतः अशोक, पत्नी शीतल, डॉ मोहन आगाशे, उषा नाईक, देवेन्द्र देव, ज्योती चांदेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटासाठी आणि आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी अशोक समर्थ आणि शीतल पाठक समर्थ यांना मनःपूर्वक शुभेच्छा.