स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही ऐतिहासिक मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जात आहे. मोगली संकटातून आणि फंद फितुरीतून महाराणी ताराराणी यांच्या निर्णायक योजना आणि धाडसी कामगिरीचा दैदिप्यमान इतिहास टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मालिकेतील वेशभूषा, भारदस्त आणि तितकीच शिवकालीन संभाषण शैली, अवाढव्य सेट, हत्ती घोडे यांची रेलचेल आणि तितक्याच प्रखर भूमिका या सर्वांमुळे मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
मुघल सम्राट औरंगजेब अक्राळविक्राळ रूप धारण करून संपूर्ण स्वराज्य गिळंकृत करण्याच्या उद्देशाने पेटून उठला होता. छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सांभाळत राजाराम महाराज निरनिराळ्या संकटांना सामोरे जात होते. त्यांना मुत्सद्दी महाराणी ताराराणी आणि पराक्रमी संताजी धनाजी याची साथ मिळाली. मालिकेमध्ये सध्या औरंगजेब भीमा नदी काठी छावणी करून ठाण मांडून असल्याचे दाखविले आहे. स्वराज्यात चहूकडे विखुरलेले त्याचे सैन्य अनेक किल्ल्यांना वेढा टाकून होते, अनेक किल्ले जिंकले देखील होते. स्वराज्य संकटात असताना छत्रपती शिवरायांनी घेतलेल्या अचाट कल्पनाशक्तीच्या निर्णयाची आठवण ठेवून, मुगलांच्या छावणीकर आक्रमण करून त्यांचे मनोधैर्य खचून टाकावे अशी योजना महाराणी ताराराणी यांनी आखली. या धाडसी आक्रमणची जबाबदारी संताजी घोरपडे यांनी स्वीकारली असल्याचे मालिकेत सध्या दाखविले आहे. मुघल सैनिकांमध्ये संताजी राव घोरपडे यांची प्रचंड दहशत होती. संताजी चालून येणार असे समजले तरी मुघल सेनानींच्या उरात धडकी भरत असे. अत्यंत नाजूक, पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून संताजी धनाजी यांनी वाचवले होते.
संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून १७ वर्षे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा सामना केला होता. जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तीर्ण प्रदेश संताजी यांच्या अधिपत्याखाली होता. मोहिमेत ठिकठिकाणी मुघल सैन्याचा समाचार घेत चौथाईच्या खंडण्या वसूल करीत मराठ्यांचा हा सेनानी छत्रपती राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असे. संताजी मुघल फौजेच्या हालचालींची व मुघल सरदारांच्या योजनांची बित्तम बातमी राखून असत. याचाच फायदा घेऊन त्यांनी केलेल्या हल्ल्यात औरंगजेबाच्या तळावरील तंबूचे कळस कापून आणल्याचे पहायला मिळणार आहे. संताजींची दहशत एवढी होती की मुघलांचे पाच हत्ती देखील त्यांनी या वेळी आणले होते. मराठ्यांच्या या महान विजयाची कहानी आणि मोगल सम्राट औरंगजेबाची नाचक्की त्या काळातील मुघल इतिहासकारांनी देखील नोंदवून ठेवले आहे हे विशेष. रणमार्तंड सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.