मराठी सृष्टीतील बरेचसे कलाकार अभिनय क्षेत्रासोबतच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळतात. तेजस्विनी पंडित, तेजश्री प्रधान या अभिनेत्रींनी स्वतःची निर्मिती संस्था उभारली आहे. याच यादीत आता लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील पाऊल टाकलेले आहे. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोची सुत्रसंचालक आहे. अभिनयासोबतच उत्कृष्ट नृत्यांगना, उत्कृष्ट कवयित्री आणि आता निर्मिती क्षेत्रात प्राजक्ता स्वतःचे करिअर घडवत आहे.
२०११ साली सुवासिनी या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रजक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. जुळून येति रेशीमगाठी मालिकेमुळे प्रजक्ताला अमाप लोकप्रियता मिळाली होती. नकटीच्या लग्नाला यायचं हं ही तिची प्रमुख भूमिका असलेली मालिका देखील खूपच गाजली होती. खो खो, पार्टी, हंपी, संघर्ष अशा चित्रपट आणि मस्त महाराष्ट्र सारख्या शो मधून ती कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली. अभिनयाचा हा प्रवास सुरु असताना आता तिने निर्मिती क्षेत्राकडे वळण्याचे धाडस केले आहे. गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी प्राजक्ताने स्वतःची शिवोहऽम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेचे तिने नाव जाहीर केले. गुरूपुष्यामृत गुरूवार आणि आजच्या मुहूर्तावर माझ्या गुरूंच्या गुरू श्री श्री रविशंकरजी शुभहस्ते माझ्या ‘निर्मिती संस्थेचं’ उद्घाटन करण्यात आलं. असं म्हणत तिने आपण निर्मिती क्षेत्रात उतरत असल्याचे जाहीर केले आहे. त्रिवेणी आश्रम पुणे इथे हजारोंच्या संख्येत जमलेल्या शिष्यांच्या भाऊगर्दीत श्री रविशंकरजी यांच्या हस्ते शिवोहऽम् चे नाव जाहीर केले आहे. आपल्या निर्मिती संस्थेचे नाव जाहीर करताच प्राजक्ताने आपल्या निर्मिती संस्थेत बनवल्या जाणाऱ्या आगामी “फुलवंती” या चित्रपटाची घोषणा देखील केली आहे.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित फुलवंती ह्या कादंबरीवर हा चित्रपट बनवण्यात येणार असल्याचे तिने म्हटले आहे. “शिवोहऽम्” संस्थेकडे या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचा हक्क आहे. लवकरच फुलवंती हा चित्रपट तुमच्या भेटीस आणू, त्यांच्या कलाकृतीचं सोनं करणं हीच आम्हांकडून त्यांस योग्य श्रद्धांजली ठरेल असे प्राजक्ताचे म्हणणे आहे. अर्थात आपल्या निर्मिती संस्थेतून बनवल्या जाणाऱ्या चित्रपटाची घोषणा तिने जाहीर केली आहे आणि लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही म्हटले आहे. या चित्रपटासाठी आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पणासाठी प्राजक्ता माळीचे खूप खूप अभिनंदन…