आपल्या अचुक विनोदशैलीने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा, संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा विनोदवीर लक्ष्मीकांत, सर्वांचा आवडता लक्ष्या. लक्ष्मीकांत खऱ्या अर्थाने मराठी सृष्टीतील खळखळता हास्याचा झरा, अगदी लहानपणापासूनच अतिशय खोडकर स्वभावामुळे अनेकांची चेष्टा मस्करी करीत सर्वांना खदखदून हसवायचं. सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती छोट्या छोट्या गोष्टींवर विनोद करून आनंद कसा मिळवायचा, विनोदाचा हा अंग त्यांनी त्यांच्या आईकडूनच शिकून घेतला होता.
लहानपणी आपण बस कंडकटर व्हायचं आणि तिकिटाचे पैसे मिळवून भरपूर श्रीमंत व्हायचं असा विचार त्यांनी केला मात्र त्यामागचे खरे सत्य काय होते ते कला क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर उमजले. हम आपके है कौन, अनाडी, साजन अशा अनेक हिंदी चित्रपटातून विनोदाचे अचूक टायमिंग हेरून प्रेक्षकांना खळखळू हसवले तर कधी निरागस अभिनयातून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. पदार्पणातील प्रसिद्ध हिंदी चित्रपटांनी अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली होती. त्यांच्या हिंदी चित्रपटातल्या काही भूमिका अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. सिनेमातील जशा हिरो हिरोईन च्या जोड्या गाजल्या तशा काही विनोदी अभिनेत्यांच्या जोड्यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. अशीच एक दिलखुलास जोडी म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि साथीला महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर.
नव्वदच्या दशकात यांच्या या जोडीने मराठी सृष्टीत अक्षरशः विनोदाचा धुमाकूळ घातला. विनोदाचे बिनचूक टायमिंग, तीव्र स्मरणशक्ती, तीक्ष्ण विनोदबुद्धी आणि सर्वोत्तम अभिनय याच्या जोडीलाच ओतप्रोत भरलेल्या माणुसकीमुळे मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीच्या इतिहासातील लखलखता तारा अचानकपणे कधी निखळला ते कळलेच नाही. मराठी नाटक, दूरदर्शन मालिका अशा प्रवासातून मराठी सृष्टीत भरघोस यश मिळवलं खरं, पण अचानक जाण्याने रसिक जणांच्या मनाला चटका लावून गेला.