मीनल पेंडसे हीने १९९९ सालच्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटात काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दर्शवले होते…याच शिलाची भूमिका चित्रपटातून अभिनेत्री मीनल पेंडसेने निभावलेली होती. या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती घेत असतात. अर्थात या सर्व घटनांमागे एसीपी निशा मॅडमचा हात असतो याचा उलगडा चित्रपटाच्या अगदी शेवटी होतो.
या चित्रपटानंतर मीनल पेंडसे २००२ सालच्या आधारस्तंभ या आणखी एका मराठी चित्रपटात झळकली. परंतु इथे ती फारशी रमली नाही. मस्ती चित्रपट, किस देश में है मेरा दिल, अमिता का अमित, मी आज्जी और साहेब या हिंदी मालिका तिने अभिनित केल्या. त्यामुळे मराठी सृष्टीपेक्षा हिंदी मालिकांमधून तिच्या अभिनयाला जास्त वाव मिळत गेला आणि इथेच ती जास्त रमत गेली असे म्हणायला हरकत नाही. मधल्या काळात तिने नंदकिशोर कुमावत यांच्याशी विवाह केला. एका विवाहसंस्थेत मिनलने आपले नाव नोंदवले होते तिथेच तिने नंदकिशोर यांचे प्रोफाईल पाहिले. पहिले लग्न नॉन ब्राह्मण व्यक्तीशी झाले होते आणि आता हे दुसरे लग्नही नॉन ब्राह्मण व्यक्तीशी त्यामुळे तिच्या या दुसऱ्या लग्नाला घरच्यांकडून थोडीशी नाराजी होती. मात्र पहिल्याच भेटीत नंदकिशोरचा स्वभाव मीनलला इतका आवडला की तिने या लग्नाला लगेचच आपला होकार कळवला.
बिनधास्त चित्रपटामुळे ओळख मिळालेल्या मीनल पेंडसे हिची सख्खी बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री ‘नेहा पेंडसे’. आज मीनल पेंडसे आणि नेहा पेंडसे मराठी सृष्टीतल्या या बहिणी म्हणून हिंदी सृष्टीतही फारशा परिचयाच्या नाहीत. कारण या दोघी बहिणी मिडियासमोर कधीही एकत्रित पाहायला मिळाल्या नाहीत हेच यामागचे मुख्य कारण आहे. नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाचा ठसा केवळ मराठी सृष्टीपुरताच मर्यादित ठेवला नाही. भाभीजी घर पर है, फॅमिली टाइम विथ कपील, तुमसे अच्छा कौन है, बाळकडू, सुरज पे मंगल भारी, नटसम्राट, एंटरटेनमेंट की रात या आणि अशा कित्येक रियालिटी शो मालिका आणि चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. एक ग्लॅमरस पण तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणूनही तिला जास्त ओळखले जाते. गेल्या वर्षी म्हणजेच जानेवारी २०२० रोजी नेहा शार्दूल सिंग बयास सोबत विवाहबद्ध झाली होती. तिच्या या लग्नाची मीडियात जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती.