सिनेसृष्टीत बऱ्याच चांगल्या वाईट अशा अनेक घडामोडी सर्वांनी मागील २ वर्षांमध्ये अनुभवल्या. सिनेमागृहे बंद असल्या कारणाने अनेक कलावंतांनी ओटीटी माध्यमाचा आधार घेत आपला अभिनय प्रवास सुरु ठेवला. परंतु अनेक प्रतिभावंत कलावंतांना ते शक्य झाले नाही, विशेष करून नाट्य जगतातील कलावंत यापासून वंचित राहिले. अनेकांचे हलाखीचे दिवस, बेरोजगार पणा या सर्वांना रसिक प्रेक्षकांनी धीर देण्याचे काम केले. राज्य सरकारने महत्वाच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णय घ्यायचे सुरु केले असून, त्यानुसार आजपासून शालेय शिक्षण वर्ग संपूर्ण राज्यभरात सुरु झाले आहेत.
ग्रामीण भागातील शाळांसाठी इयत्ता ५ वी ते १२ वी तर जास्त लोक वस्तीच्या शहरी भागासाठी इयत्ता ८ वी ते १२ वी अशा प्रकारची विभागणी केली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे तसेच चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु होणार असल्याची चर्चा सुरु होती. दिल्ली, गुजरात आणि तामिळनाडू सह साऊथच्या अनेक भागांतील सिनेमागृहांनी यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये चित्रपट प्रेक्षकांसाठी आपली दरवाजे उघडली होती, तर महाराष्ट्र आणि केरळमधील चित्रपट गृहांवरील निर्बंध आतापर्यंत कायम ठेवण्यात आले होते. पेन स्टुडिओचे अध्यक्ष जयंतीलाल गडा, दिग्दर्शक निर्माते रोहित शेट्टी, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे व पीव्हीआर सिनेमाचे अध्यक्ष कमल गियानचंदानी, आयनॉक्स लेझर लिमिटेडचे अध्यक्ष आलोक टंडन, सिनेपोलिस इंडियाचे अध्यक्ष देवांग संपत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृह सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरनंतर आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंतांनी सहर्ष प्रतिसाद दिला आहे. लवकरच नवनवीन चित्रपट आणि नाटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल यासाठी मायबाप प्रेक्षकांनीही सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.