चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी अनेक कलाकारांनी स्ट्रगल केला आहे. अभिनेता भरत जाधवला देखील हा स्ट्रगल चुकलेला नाही. मूळचा कोल्हापूरचा असलेला भरत सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना विविध नाटकांमधून काम करत असे. इथेच त्याचे केदार शिंदे आणि अंकुश चौधरी सोबत मैत्रीचे सूर जुळून आले. ऑल द बेस्ट हे त्यांचं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं होतं. सही रे सही, मोरूची मावशी, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक नाटकांतून त्याच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक करण्यात आले.
‘लक्ष्मी’ हा त्याने अभिनित केलेला पहिला चित्रपट अंकुश चौधरी आणि भरत जाधवची जुळून आलेली केमिस्ट्री या चित्रपटातूनही प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. चित्रपट, मालिका, नाटक असा यशस्वी प्रवास सुरू असताना गावी गेल्यावर घर नसल्याने कुठे राहायचं?.. हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. अखेर कोल्हापूर येथेच एक अलिशान बंगला त्याने विकत घेतला आणि आपल्या आई वडिलांना प्रथमच विमानाने घेऊन तो या नव्या घरात दाखल झाला. मराठी सृष्टीतील मानधन वाढवून घेणारा पहिला अभिनेता म्हणून भरत जाधवला ओळख मिळाली होती. त्याच्याच प्रयत्नाने आज मराठी सृष्टीतील इतर कलाकारांना तगडे मानधन मिळण्यास मदत झाली आहे.
यशाचा हा प्रवास अनुभवत असताना डॉटर्स डे च्या दिवशी त्याचा आनंद आणखी द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. भरत जाधवला सुरभी आणि आरंभ अशी दोन अपत्ये आहेत त्याची लेक ‘सुरभी जाधव’ ही नुकतीच डॉक्टर झाली आहे. एमबीबीएस परीक्षेत उत्तम गुण मिळवून सुरभिने आपले वैद्यकीय शिक्षण पुण्याच्या S.K.N.M.C कॉलेज मधून पूर्ण केले आहे. जागतिक कन्या दिनाच्या दिवशी भरतने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘डॉ. सुरभी भरत जाधव, खूप आनंद आणि अभिमान!’ असे कॅप्शन देऊन त्याने आपल्या लेकीला जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बहुतेक कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कलाक्षेत्रात आपला जम बसवताना दिसतात. मात्र आपल्या वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता सुरभिने मेडिसिन आणि सर्जरी क्षेत्र करिअर म्हणून निवडले आहे तिच्या याबातमीने सुरभीचे सर्वत्र मोठे कौतुक होताना दिसत आहे.