गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेल प्रसिद्ध वगनाट्य, या नाट्यास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार देखील मिळाला, पुढे २००६ मध्ये सुमित मुव्हीजची निर्मिती असलेला चित्रपट राजू फुलकर यांनी दिग्दर्शनाची धुरा लीलया पेलली.. मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, संजय खापरे, नंदू पोळ, सिध्देश्वर झाडबुके, अन्वय बेंद्रे, समिरा गुजर आणि सोनाली कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांनी यात अप्रतिम अभिनय केला.
दिग्दर्शक राजू फुलकर यांनी गाढवांचं लग्न, आई एकविरेचा उधो उधो , कलम ३०२, अभियान, निष्कलंक, आभरान, हसतील त्याचे दात दिसतील अशा विविध चित्रपटांसाठी लेखक, दिग्दर्शन, स्टोरी रायटिंग, आणि कला, संगीत दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांना चित्रपट उद्योगातील त्याच्या अद्भुत योगदानासाठी झी गौरव, झी टॉकीज, व्ही शांताराम पुरस्कार या सारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत सकाळ, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक आणि इतर अनेक स्पर्धांसाठी ज्युरी म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. त्यांनी संत नामदेव, संत जनाबाई सारखे संत महात्म्य अशा अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. ४० हुन अधिक नाटक आणि एकांकिका नाटकांसाठी लेखन देखील केले आहे.
आयुष्यातील सुमारे चार दशके विविध पैलूंद्वारे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला योगदान देणाऱ्या श्री.राजू फुलकर यांनी राजू फुलकर फिल्म अकादमी RPFA नावाची संस्था देखील सुरु केली होती, चित्रपट उद्योगात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व स्तरातील गुणवंत कलाकारांना घडविण्याचे मोलाचे योगदान त्यांनी दिले. पुणे, मुंबई, तुळजापूर, नागपूर, गडचिरोली अशा वेगवेगळ्या ठिकाणांवर मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक विद्यार्थ्यांना घडवले. भारती हॉस्पिटल मध्ये किडनीच्या आजारावर उपचार घेत असताना काल संध्याकाळी त्यांची प्राणज्योत माळवली. मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीला मोलाचे योगदान देणाऱ्या अष्टपैलू दिग्दर्शकाला भावपूर्ण श्रद्धांजली.