मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेता योगेश सोहनी याला काही दिवसांपूर्वी एका इसमाने धमकावून त्याच्याकडून काही हजार रुपये लाटले होते. मात्र या घटनेची तक्रार दाखल करताच पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्या आरोपिला ताब्यात घेण्यात आले होते. या घटने पाठोपाठ आता मुलगी झाली हो याच मालिकेतील एका अभिनेत्रीच्या गळ्यातील चैन एका सोनसाखळी चोराने हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “सविता मालपेकर”. सविता मालपेकर मुलगी झाली हो या लोकप्रिय मालिकेत ‘दमयंती पाटील’ म्हणजेच माऊच्या आजीची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत घडलेली ही घटना नेमकी काय होती ते जाणून घेऊयात…
१९ जुलै रोजी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सविता मालपेकर या नेहमीप्रमाणे शिवाजीपार्कला वॉकसाठी गेल्या होत्या. गेल्या ४० वर्षांपासून त्या शिवाजी पार्क परिसरात वास्तव्यास आहेत आणि त्यामुळे त्या नेहमीच वॉक करण्यासाठी या पार्कमध्ये जात असतात. शिवाजी पार्कमध्ये तीन राउंड मारून झाल्यावर त्या एका झाडापासल्या कट्ट्यावर जाऊन बसल्या. त्या दिवशी पाऊस असल्याने लोकांची वर्दळ फार कमी होती. सविता मालपेकर मोबाईलवर बोलत होत्या तेवढ्यात समोरून डोक्याला पांढरा रुमाल बांधलेली आणि तोंडाला मास्क असलेली एक व्यक्ती टू व्हीलरवरून त्यांच्याजवळ आली आणि वेळ किती झाला हे विचारू लागली. सविता मालपेकर यांनी माझ्याकडे घड्याळ नसल्याचे सांगितले. तर ती व्यक्ती मोबाईलमध्ये पाहून सांगा म्हणून विचारणा करू लागली त्यावर त्या ‘मी मोबाईलवर बोलतीये आता वेळ नाही सांगणार’ असे म्हणाल्या. असे म्हटल्यावर ती व्यक्ती पुढे निघून गेली. काही वेळाने सविता मालपेकर यांच्या पाठीवर एक जोरदार हात पडला यात त्यांचा ड्रेसही फाटला गेला आणि त्याच इसमाने मागून येऊन गळ्यातली सोनसाखळी खेचून नेली आणि जवळच पार्क केलेल्या बाईकवरून पळ काढला.
आसपासच्या मुलांनी त्या चोराचा पाठलाग केला मात्र त्याला पकडण्यात अपयश आले. काही मिनिटातच सविता मालपेकर यांनी शिवाजी पार्क पोलिसांना फोन लावला आणि पुढच्या क्षणी पोलिसांनी तत्परता दर्शवत त्या परिसरात एन्ट्री घेतली. पोलिसांनी चोराला ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज दाखवले त्यात सविता मालपेकर यांनी त्या चोराला बरोबर ओळखले देखील. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सविता मालपेकर यांनी कौतुक केले असून शिवाजी पार्क परिसरात सर्व गेटवर आणि मधल्या भागातही सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे जेणेकरून माझ्यासोबत घडलेली घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असती. यापुढील तपास शिवाजी पार्कचे पोलीस त्याच तत्परतेने करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
याअगोदरही शुटिंगवरून येत असताना सविता मालपेकर यांच्यासोबत अशी घटना घडली होती. वांद्र्यावरून येत असताना त्यांचे मंगळसूत्र आणि चैन अशाच एका चोरट्यांनी लंपास केले होते.सविता मालपेकर या गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. मालिका, चित्रपट आणि नाटकांतील आपल्या रोखठोख भूमिकांमुळे त्या जास्त ओळखल्या जातात. मुळशी पॅटर्न, कुंकू लावते माहेरचं, काक स्पर्श, गाढवाच लग्न, आई पाहिजे, मी शिवाजी पार्क, मुलगी झाली हो, गोट्या या आणि अशा अनेक मालिका, चित्रपट, नाटक त्यांनी अभिनित केली आहेत. हथीयार ह्या हिंदी चित्रपटातूनही त्या झळकल्या आहेत.