अशी ही बनवाबनवी हा मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट आजही हा चित्रपट टीव्हीवर पाहिला की तितक्याच आपुलकीने पाहिला जातो हे विशेष. धनंजय माने, शंतनू, परशा आणि सुधीर या चार मित्रांची ही धमाल कहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. आज या चित्रपटातील शंतनूची भूमिका साकारणाऱ्या कालाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
ही भूमिका साकारली होती सिद्धार्थ रे याने. त्याचे जन्मनाव सुशांत रे असून तो दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा नातू होता. चाणी आणि जैत रे जैत, बाळाचे बाप ब्रह्मचारी या मराठी चित्रपटातून तो बालभूमिकेत झळकला होता. वंश, पहचान, युद्धपथ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. त्याचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने काजोलच्या मित्राची भूमिका साकारली होती. वंश चित्रपटातील ‘आके तेरी बाहों में… ‘ हे लोकप्रिय गाणं त्याच्यावर चित्रीत झालं होतं. सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. चरस हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
सुशांतचे लग्न अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत झाले होते. अक्षय कुमारच्या पहिल्या चित्रपटाची नायिका म्हणून तिला आजही ओळखले जाते. सौगंध, फुल और अंगार, मेरे साजन या हिंदी चित्रपटासोबत काही दाक्षिणात्य चित्रपटातून ती झळकली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शांतीप्रियाने आपल्या दोन्ही लहान मुलांचा सांभाळ केला. शुभम आणि शिष्या ही त्यांची दोन अपत्ये आज कलाक्षेत्रात जम बसवू पाहत आहे. शुभम हा थोरला मुलगा असून म्युजिक क्षेत्रात त्याला रस आहे तर शिष्या या धाकट्या मुलाला दिग्दर्शन क्षेत्राचे वेध लागले आहेत. त्यात त्याने शिक्षणही घेतले आहे. काही मोजक्या प्रोजेक्टचे त्याने दिग्दर्शन केलेले असून यातच तो आपले करिअर घडवत आहे.