वैचारिक पातळीची उंची गाठता येते ती सभोवतालच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत वातावरणामुळे . अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याही आयुष्यात अशाच व्यक्तिमत्वाची साथ मिळत गेली आणि त्याचा परिणाम तिच्या प्रत्येक कलाकृतीतून निदर्शनास आला. आज १७ मे रोजी मुक्ता बर्वे हिचा जन्म झाला या निमित्ताने तिच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात…
पुण्यातील चिंचवड परिसरात मुक्ताचा जन्म झाला इथेच ती लहाणाची मोठी झाली. आई विजया बर्वे या शिक्षिका आणि नाट्य लेखिका त्यामुळे आईच्याच ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकातून तिने वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. अभिनयाचे खरे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. मुक्ताचे वडील वसंत बर्वे हे टेल्को कंपनीमध्ये नोकरी करत होते कंपनीच्या नाट्यस्पर्धेत रत्नाकर मतकरी यांच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात मुक्ताला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मुक्ता १५ वर्षांची होती.
अभिनयाची गोडी इथूनच तिच्यात निर्माण होत गेली आणि पुढे पुणे विद्यापीठ (आताचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) येथून नाट्यशास्राची पदवी तिने प्राप्त केली. ‘घडलंय बिघडलंय’ ही तिची पदर्पणातली पहिली टीव्ही मालिका यानंतर तिने पिंपळपान, बंधन, आभाळमाया या मालिकांमधून सुरुवातीला छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती २००४ सालच्या ‘चकवा’ चित्रपटातील भूमिकेमुळे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते त्यासाठी तिला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर जोगवा, एका लग्नाची दुसरी गोष्ट, कोडमंत्र, छापा काटा, कबड्डी कबड्डी, मुंबई पुणे मुंबई, दोघी, हृदयांतर अशा विविध चित्रपट, मालिका आणि नाटकांतून तिच्या दर्जेदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपट आणि त्यातील भूमिका निवडण्याच्या तिच्या अभ्यासू वृत्तीचे दर्शन प्रेक्षकांना वेळोवेळी घडत गेले. याच कारणामुळे मुक्ता स्वतंत्र विचारांची नायिका म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वतःला एकाच भूमिकेत साचेबद्ध न ठेवता सोज्वळ, विनोदी आणि गंभीर भूमिका देखील तिने तितक्याच नेटाने सांभाळलेल्या पाहायला मिळाल्या. याशिवाय झी गौरव पुरस्कार आणि आम्ही मराठी पोरं हुशार या शोचे सूत्रसंचालन असो वा मालिकांची निर्माती तसेच ‘पक्षी वाचवा’ मोहीम असो वा तिने लिहिलेली ‘शोध’ कविता या सर्वातूनच तिच्या अभ्यासू वृत्तीची आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या धाडसी वृत्तीची जाणीव करून देतात. अशा या सालस आणि बहिगुणी अभिनेत्रीला आमच्या समूहाकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!…