७ मे १९७२ हा अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जन्मदिवस. काल त्यांचा ४९ वा वाढदिवस साजरा झाला. वयाच्या पन्नाशीतही त्यांचे रूप आजही तितकेच चिरःतरुण दिसते हे विशेष. मराठी सृष्टी सोबतच हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या गुणी नायिकेबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
अश्विनी भावे यांचे वडील शरद भावे हे प्राध्यापक त्यामुळे लहानपणापासूनच अश्विनीवर चांगले संस्कार होत गेले. अश्विनी भावे ही अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आली ती ‘अंतरिक्ष’ या मालिकेतून. शाब्बास सुनबाई हा तिचा पहिला मराठी चित्रपट तर अशी ही बनवाबनवी या तिने अभिनित केलेल्या दुसऱ्या चित्रपटातली तिची ‘लिंबू कलरची साडी’, आणि डोळ्यांवरील मोठा गॉगल आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. धडाकेबाज चित्रपटातली इन्स्पेक्टर असो वा सरकरनामा चित्रपटातली धडाडीची पत्रकार तिने आपल्या अभिनयातून अगदी चोख बजावलेली दिसली. बंधन ,मीरा का मोहन , हिना सैनिक, मोहोब्बत की आरजु अशा हिंदी चित्रपटातून तिच्या सोज्वळ भूमिकांचे खूप कौतुकही झाले. वजीर, कदाचित, एक रात्र मंतरलेली हेही चित्रपट अधोरेखित करणारे ठरले. लग्नानंतर अश्विनी पती किशोर बोपरडीकर यांच्यासोबत सॅनफ्रान्सिस्कोला स्थायिक झाली. ‘समीर ‘ हा तिचा थोरला मुलगा तर ‘साची’ ही तिची धाकटी मुलगी या मुलांच्या संगोपणानंतर पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीकडे तिने आपले पाऊल टाकले. ‘कदाचित ‘या मराठी चित्रपटाची नायिका बनून पुन्हा ती प्रेक्षकांसमोर आली. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहत असली तरी आपली भाषा, संस्कृती ती अजिबात विसरलेली नाही. तिकडे राहूनही तिची दोन्ही मुलं आज उत्तम मराठी बोलू शकतात हे ती आपल्या चाहत्यांना आवर्जून सांगते. शिवाय घराच्या परिसरात आपली ग्रीन गार्डनची आवडही ती जोपासताना दिसत आहे. तिच्या गार्डनमधली फळं मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी तिच्या घरी जाऊन मनमुरादपणे चाखली आहेत हे विशेष .
मराठी सृष्टीला लाभलेल्या या गुणी नायिकेला आमच्या kalakar.info टीम कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ….