गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव काही निर्बंध लावल्यामुळे सर्वच मालिकांचे शूटिंग थांबवले गेले होते. त्यामुळे बऱ्याच मालिकांनी सुरुवातीला रिपीट टेलिकास्ट करण्यावर अधिक भर दिलेला पाहायला मिळाला होता.
मात्र यावर तोडगा काढून मालिकेच्या आयोजकांनी चित्रीकरण स्थळ महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
साधारण मागील दोन आठवड्यांपासून हिंदी मालिकांसह अनेक मराठी मालिका परराज्यात शूट केल्या जाऊ लागल्या होत्या. यातील बहुतेक लोकप्रिय मालिका सध्या गोव्यामध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत तर काही मालिका जयपूर, गुजराथ, हैद्राबाद सारख्या ठिकाणी आपले शूटिंग करत आहेत.
तर काही मालिकांना अपेक्षित चित्रीकरण स्थळ मिळत नव्हते त्यामुळे त्यांनी चित्रीकरण करणेच थांबवले होते. यात कारभारी लयभारी, तू सौभाग्यवती हो, रात्रीस खेळ चाले या मालिकांना हवे तसे चित्रीकरण स्थळ मिळत नसल्याने त्यांनी चित्रीकरणच थांबवले होते. मात्र ज्या मालिकांचे शूटिंग सुरू झाले त्या परराज्यात जाऊनही पुन्हा एकदा त्यांचे शूटिंग थांबवले गेले असल्याचे समोर येत आहे. गोवा सरकारने नुकतेच याबाबत निर्बंध लावले असून सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा या मालिका काही दिवसांसाठी ठप्प होणार आहेत.
सध्या गोव्यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचे शूटिंग चालू झाले होते. अग्गबाई सुनबाई, सूर नवा ध्यास नवा, सुख म्हणजे नक्की काय असतं, पाहिले न मी तुला, रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिका गोव्यामध्ये चित्रित केल्या जात होत्या मात्र आता या मालिका पुढील काही दिवसांसाठी तरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत असेच चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. या निर्णयामुळे मालिकेचे कलाकार महाराष्ट्रात परतणार की पुन्हा एकदा पर्यायी मार्ग शोधणार हे लवकरच स्पष्ट होईल….