अभिनेत्री तीतीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि तीतीक्षाचा साखरपुडा संपन्न झाला. दोन दिवसांपूर्वी सिध्दार्थच्या घरी हळद फोडण्याचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर वऱ्हाड निघालं बरं का असे म्हणत तो अभिनेत्री अनघा अतुल सह ठाण्यात दाखल झाला. काल रविवारी या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला असून आज सकाळीच लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनीही अशाच पद्धतीने लग्नसोहळा केला होता.
साखरपुडा आणि त्यानंतर लगेचच लग्न अशा थाटात या अभिनेत्री आता लग्न करू लागल्या आहेत. त्यामुळे तीतीक्षाच्या लग्नाचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवानी सुर्वे हिने देखील अजिंक्य ननावरे सोबत ठाण्यात लग्न केले होते. तिच्या पाठोपाठ आता तीतीक्षा देखील सिद्धार्थ बोडके सोबत ठाण्यातच लग्नगाठ बांधत आहे. या लग्नाला मराठी सेलिब्रिटींची हजेरी लागलेली आहे. आज सकाळी या दोघांच्या हळदीचा सोहळा रंगला. यावेळी रसिका सुनील, गौरी नलावडे, ऋतुजा बागवे या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. तू अशी जवळी रहा या झी युवा वरील मालिकेत सिद्धार्थ आणि तीतीक्षा एकत्रत झळकले होते. मालिकेतून एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळून आले होते. सिध्दार्थने मराठी मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे.
नुकताच त्याने अभिनित केलेला श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यासोबतच सिध्दार्थने बॉलिवूड चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दृश्यम २ या बॉलिवूड चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तीतीक्षा तावडे ही देखील अभिनेत्री म्हणून गेली अनेक वर्षे मराठी मालिका सृष्टीत काम करत आहे. खुशबू तावडे या तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत ती देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली होती. सरस्वती, जयंती, वास्तू रहस्य अशा चित्रपट, मालिकेतून तिने प्रमुख भूमिका साकारलेली पहायला मिळाली. तू अशी जवळी रहा या २०१८ मध्ये प्रसारित झालेल्या मालिकेत सिद्धार्थ सोबत तिला प्रमुख भूमिका मिळाली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करू लागले होते. आता ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे दोघेही लग्नबंधनात अडकताना दिसणार आहेत. त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली असून या सोहळ्याच्या थाट कसा असणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये लागून राहिली आहे.