अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा आज १ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला सुहास जोशी, सायली संजीव, हेमंत ढोमे या कलाकारांनी हजेरी लावली होती. शिवानी आणि अजिंक्य हे २०१५ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांचे लग्न कधी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून होती. काल ३१ जानेवारी रोजी शिवानीने अजिंक्य सोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले तेव्हा अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता. त्यानंतर आज शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाचा शाही थाट सजलेला पाहायला मिळाला.

लग्नाचा थाट पाहून अनेकांना हे ठिकाण जाणून घेण्याची उत्सुकता होती. कारण हिरव्यागार गर्द झाडीत पांढऱ्या फुलांनी सजलेला लग्न मंडप, तसेच जवळच असलेला तलाव पाहून अनेकांना या ठिकाणाची भुरळ पडलेली पाहायला मिळाली. शिवानी आणि अजिंक्य चे लग्न कुठे झालं? अशी विचारणा होऊ लागली. पण हे लग्न स्थळ मुंबई आणि पुण्याच्या मध्ये आहे हे जाणून तुम्हालाही इथे लग्न करण्याचा मोह आवरणार नाही. हे ठिकाण आहे ठाण्यातील येऊर हिल्स येथे. येऊर हिल्स हे ठिकाण निसर्गाने व्यापलेलं आहे. इथले डोंगर, धबधबे पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. शिवानी आणि अजिंक्यचे लग्न एक्सॉटिक रीट्रीट या रिसॉर्टमध्ये पार पडले आहे.

खास डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शिवानी आणि अजिंक्यने त्यांचे हे लग्न खास ठरण्यासाठी या ठिकाणाची निवड केली आहे. मुंबई पुण्याहून यायला अतिशय सोयीस्कर असल्याने लोकं आता लग्नासाठी अशा ठिकाणांना प्राधान्य देऊ लागले आहेत. बॉलिवूड सृष्टीत तर डेस्टिनेशन वेडिंग प्रचलित होऊ लागले आहेत. त्यामुळे मराठी सृष्टीतही आता असे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचे लग्न अतिशय खाजगीत पार पडले असल्याने त्यांनी लग्नाबाबत गुप्तता बाळगली होती. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांचेही लग्न अशाच पद्धतीने पार पडले होते. त्यामुळेच या लग्नाची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळत आहे.