अभिनयाच्या जोडीला आता कलाकारांनी व्यवसायाची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध कलाकार हॉटेल व्यवसाय, दागिन्यांचा, साड्यांचा व्यवसाय करताना दिसत आहेत. प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, श्रेया बुगडे, अनघा अतुल या सेलिब्रिटींनी एका वेगळ्या व्यवसायाची वाट धरलेली पहायला मिळाली. पण आता स्वतःचा कपड्यांचा ब्रँड असूनही तेजस्विनीने आणखी एका व्यवसायात पाऊल टाकलेले पाहायला मिळत आहे. काल राज ठाकरे यांच्या हस्ते तेजस्विनी पंडितच्या नव्या व्यवसायाची ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार पडली.
सिद्धार्थ जाधव सह नामांकित व्यक्तींना यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. AM to AM Salon या नावाने तिने हे सलून पुण्यातील संगमवाडी येथे सुरू केले आहे. मध्यरात्रीही सेवा देणारे हे पुण्यातील पहिलेच सलून असल्याचा दावा तेजस्विनीने केला आहे. सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणेकरांसाठी ही सेवा देण्याचा तिने विचार केला आहे. तेजस्विनी अगोदर अभिनेत्री सिया पाटील हिनेही सलून व्यवसायात पाऊल टाकले होते. मुंबईत आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने बारामती मध्ये दुसरी ब्रँच ओपन केली होती. सलून व्यवसाय सुरू करणाऱ्या सिया पाटील आणि तेजस्विनी पंडित अशा दोन अभिनेत्रींनी त्यांचे नाव या यादीत गोवलेले पाहायला मिळत आहे. तेजस्विनी पंडितचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड आहे. जो तिने अभिज्ञा भावे सोबत सुरू केलेला होता.
या ब्रॅंडला आता मोठी लोकप्रियता मिळाली असून तेजस्वीनीने दुसऱ्या व्यवसायातही लक्ष घालण्याचे ठरवले आहे. जिजाऊ हा तेजस्विनी पंडितचा आगामी चित्रपट आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यात आले असून तेजस्विनी यात जिजाऊंची प्रमुख भूमिका साकारणार हे जाहीर करण्यात आले होते. चित्रपट, वेबसिरीज असा तेजस्विनी पंडितचा यशस्वी प्रवास सुरु आहे. त्यात आता साईड बिजनेस म्हणून ती सलून व्यवसायात उतरली आहे. कलाकारांनी अभिनय क्षेत्रावर अवलंबून न राहता काहीतरी व्यवसाय करायला हवा अशी भावना अनेकदा व्यक्त करण्यात येते. कारण एका काळानंतर तुम्हाला अभिनय क्षेत्रात काम मिळेलच याची शाश्वती नसते. त्यापेक्षा मिळालेला पैसा योग्य जागी गुंतवून भविष्याचा विचार करण्यातच मोठे शहाणपण आहे.