ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अशा जाण्याने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे. रविंद्र बेर्डे हे ७८ वर्षांचे होते. गेले काही वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार झाल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून घरी जाण्यास परवानगी दिली होती. मात्र श्वसनाचा त्रास वाढू लागला आणि अशातच त्यांना हृदविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले जाते.
रविंद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. रविंद्र बेर्डे यांनी मराठी नाटक तसेच चित्रपट सृष्टीतून अभिनयाचा ठसा उमटवला होता. वयाच्या २० व्या वर्षीच रविंद्र बेर्डे नभोवाणीत काम करत होते. नभोनाट्यांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. नाटकातून प्रवास सुरु झाल्यानंतर त्यांना चित्रपटातून झळकण्याची संधी मिळाली होती. चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका यामुळे त्यांना हिंदी चित्रपट देखील मिळाले होते. नजरेतील करारीपणा आणि चेहऱ्यावरील भाव यांमुळे त्यांना खलनायकी ढंगाच्या भूमिका देखील मिळू लागल्या. धडाकेबाज, थरथराट, गंमत जंमत, भुताची शाळा, खतरनाक, हमाल दे धमाल, झपाटलेला अशा गाजलेल्या चित्रपटातून रविंद्र बेर्डे यांना विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. १९७७ साली राज्यनाट्य स्पर्धेत त्यांना सिल्व्हर मेडल मिळाले होते.
३०० हुन अधिक चित्रपट, मालिका, जाहिराती तसेच नाटक आणि काही हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ९० च्या दशकात त्यांना हृदविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यानंतर रविंद्र बेर्डे काही मोजक्या चित्रपटातून काम करत होते. मात्र २०११ पासून त्यांना घशाच्या कॅन्सरने त्रासले होते. या गंभीर आजाराशी तोंड देत असताना रविंद्र बेर्डे नाटक पाहण्याची आवड जोपासू लागले होते. अभिनय क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर ते नातवंडांसोबत आपला वेळ घालवू लागले. सोबतच नाटक पहायलाही ते जात असत. रविंद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे सोबत अनेक चित्रपटातून काम केले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली आहे. रविंद्र बेर्डे यांना आमच्या समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.