झिम्मा २ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील, आदेश बांदेकर यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. रिंकू राजगुरू हिनेही हा चित्रपट पुरुषांनी देखील पाहायला हवा असे मत व्यक्त केले आहे. रिंकूने या चित्रपटात निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या एका नवीन भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक आहे.
प्रेक्षकांना झिम्मा २ आवडतोय अशा प्रतिक्रिया आता चित्रपट पाहून येणाऱ्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत. या चित्रपटात सुचित्रा बांदेकर या महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. झिम्मा २ हा चित्रपट झिम्मा चित्रपटाचा पुढचा भाग आहे. त्यामुळे सुचित्रा बांदेकर यांना या चित्रपटात पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. पण या भूमिकेसाठी अगोदर दुसऱ्याच कोणालातरी कास्ट करण्यात आले होते, असा एक खुलासा सुचित्रा यांनी केला आहे. त्या म्हणतात की, मी माझ्या २० ते २२ वर्षांच्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले आहेत. त्यातील झिम्मा आणि बाईपण भारी देवा हे चित्रपट मित्रांनी दिले आहेत. झिम्मा चित्रपटासाठी अगोदर दुसऱ्याच कोणचीतरी निवड करण्यात आली होती.
पण त्यावेळी त्या कलाकाराने चित्रपटासाठी नकार दिला होता. क्षिती माझी खूप जवळची मैत्रीण, म्हणून मग तिने मला फोन करून हा चित्रपट करणार का असे विचारले. मला हेमांतचा फोन आला नव्हता पण क्षितीने मी एक चित्रपट प्रोड्युस करतीये आणि त्यात तू काम करशील का असे म्हटले होते. क्षितीचा फोन आला त्यावेळी मी परदेशात होते. पण मी तेव्हा चित्रपट करतीये असे तिला आश्वासन दिले होते. मी भूमिका काय आहे, कशी आहे याचा विचारसुद्धा केला नव्हता तेव्हा तिला लगेचच हो म्हणून टाकले. तिलाही खात्री होती मी हा चित्रपट नाकारणार नाही. मला झिम्मा चित्रपट मिळाला आणि आता मी झिम्मा २ मध्येही आहे, असे त्या म्हणाल्या.