आई कुठे काय करते मालिकाफेम मिलिंद गवळी हे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांचे विचार अनेकांना पटतात देखील. यावयातही मिलिंद गवळी यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. चालणे, व्यवयाम करणे हे त्यांचे नित्याचे ठरलेले असते. नुकतेच मिलिंद गवळी यांनी लोहगडला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा झेन नावाचा कुत्राही होता. झेन जसा गड चढायला धावत सुटला तो थेट वर जाऊनच थांबला. त्याचे हे कौतुक सुरू असतानाच मिलिंद गवळी यांच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते.
अशातच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आताच्या पिढीलाही मिळायला हवी असा विचार त्यांच्या डोक्यात घर करून गेला. आळशी इंटरनेटच्या शिक्षणपद्धतीतून मुलांना हर बाहेर काढायचे असेल तर त्यासाठी त्यांनी एक विचार सोशल मीडियावर मांडला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, लोहगड, परवा हा गड चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते. आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढता. तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो, ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात.
दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत. एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते. माझ्याबरोबर Zen आमचा कुत्रा होता, तो एका दमात वरती धावत सुटला, त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला. असं वाटलं की आपल्या मध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी, वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते. ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवतात जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो. आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील.
जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली. एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड. या सगळ्या गडांवर किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला. तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.