२०१३ साली झी मराठी वाहिनीवर जुळून येती रेशीमगाठी ही मालिका प्रसारित होत होती. आदित्य आणि मेघनाची प्रेम कहाणी या मालिकेतून पाहायला मिळाली होती. ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेमुळे दोघांना प्रसिद्धीच्या झोतात आणले गेले. सोबतच सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मधूगंधा कुलकर्णी, विघ्नेश जोशी, उदय टिकेकर यांचीही साथ त्यांना मिळाली होती. मालिकेला प्रसारित होऊन दहा वर्षे लोटली आहेत मात्र तरीही त्यातील आदित्य आणि मेघना प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
नुकतेच दहा वर्षांनी या मालिकेच्या कलाकारांचे रियुनियन पाहायला मिळाले. यावेळी ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी, मधूगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अरुणा जोगळेकर यांनी एक दिलखुलास मुलाखत दिली. मुलाखतीतून कलाकारांमध्ये जुळलेल्या बॉंडिंगबद्दल खूप काही चर्चा रंगल्या. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी एकमेकांसोबत फोटो काढून मालिकेचा दुसरा भाग काढायचा का? असा प्रश्न विचारला. अर्थात ललितच्या या प्रश्नावर त्याच्या चाहत्यांनी होकारच दिलेला पाहायला मिळाला. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. तर अनेकांना ही एक दुसऱ्या भागाची हींट तर नसावी ना असाही प्रश्न पडला आहे.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेनंतर ललित आणि प्राजक्ता पुन्हा कधीच एकत्र पाहायला मिळाले नव्हते. मात्र जर या मालिकेचा दुसरा भाग बनत असेल तर त्याचे आम्ही नक्कीच स्वागत करू असेही प्रेक्षकांचे म्हणणे आहे. ललितने देखील याअगोदर दोन तीन मालिका केल्या होत्या पण प्रमुख भूमिकेसाठी त्याला या मालिकेने मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. या नंतर ललित छोट्या पडद्द्यावरून गायब झाला आणि चित्रपटात झळकू लागला. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ललित प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण तरीही त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यायला हवे असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. अर्थात त्याचीही पुन्हा मालिकेत काम करण्याची इच्छा आहेच, पण त्यासाठी योग जुळून यावा लागतो असे म्हणतात. तो योग जुळून येती रेशीमगाठी २ च्या निमित्ताने यावा हीच एक सदिच्छा.