रिमा लागू यांनी हिंदी चित्रपटात आईच्या भूमिका विशेष गाजवल्या. रिमा लागू या वैयक्तिक आयुष्यात स्वछंदी आणि मनस्वी व्यक्तिमत्व होत्या. त्यांना आपल्यातून जाऊन जवळपास सहा वर्षे लोटली आहेत. मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिकेमुळे त्या कायम आपल्यासोबत आहेत असे वाटत राहते. मंदाकिनी भडभडे या रिमा लागू यांच्या आई. नयन हे रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे नाव. मंदाकिनी भडभडे या मराठी चित्रपटातून अभिनय साकारत असत. पण आपल्या मुलीने शिक्षण पूर्ण करावे यासाठी नयनला त्यांनी पुण्यातील हुजूरपागा शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते.
अभिनयाची आवड असलेल्या नयनने शाळेतील नाटकातून सहभाग दर्शवला. इथूनच अभिनयाचा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पुढे मुंबईत आल्यानंतर नयन भडभडे यांनी बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कलाकारांना बँकेत नोकरी करण्याची संधी मिळत असे. ती फुलराणी या नाटकातून काम करत असताना त्यांची विवेक लागू सोबत ओळख झाली. दोघांनी एकाचवेळी बँकेची परीक्षा दिली तेव्हा सहा मधून या दोघांनीच ती परीक्षा पास केली. नाटक, चित्रपट प्रवास सुरु असतानाच विवेक लागू सोबत त्यांचे प्रेम जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि नयन भडभडेच्या रिमा लागू झाल्या. मृण्मयी लागू ही त्यांची एकुलती एक मुलगी. मृण्मयी लहान असताना रिमा लागू सतत शूटिंगमध्ये व्यस्त असत.
मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी इतर कोणाला देण्यापेक्षा त्यांनी तिला होस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी फिरून त्यांनी हॉस्टेल शोधले, शेवटी पाचगणीमध्ये त्यांना पाहिजे तसे हॉस्टेल मिळाले. मृण्मयी जेव्हा दोन महिन्यांच्या सुट्टीवर घरी यायची तेव्हा रिमा लागू कुठल्याच ऑफर स्वीकारत नसत. याकाळात त्यांनी अनेक चांगल्या ऑफर्सना नाकारले होते. घर, कुटुंब, सणवार साजरे करणे रिमा लागू यांना खूप आवडायचे. आपली मुलगी देखील याच क्षेत्रात यावी असा त्यांनी विचार केला. पण मृण्मयीने जेमतेमच प्रोजेक्ट्स केले. दोघात तिसरा आता सगळं विसरा, मुक्काम पोस्ट लंडन या मराठी चित्रपटानंतर मृण्मयी अभिनय क्षेत्रातून बाजूला झाली.
अभिनय क्षेत्र आवडत नाही आणि आता यात काहीच करिअर करण्याची इच्छा नाही. असा निश्चय केल्यानंतर तिने आपला निर्णय आईवडिलांना सांगितला. त्यांनीही तिच्या आवडत्या क्षेत्रात जाण्याची तिला परवानगी दिली. गेली अनेक वर्षे मृण्मयी अभिनय क्षेत्र सोडून बॅक आर्टिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. असिस्टंट म्हणून तिने थ्री इडियट्स चित्रपटासाठी काम केले होते. आमिर खानच्या दंगल चित्रपटापर्यंत मृण्मयीने असिस्टंट म्हणून काम केले. पण आता मृण्मयी वेबसिरीज आणि चित्रपटांसाठी रायटर म्हणून काम करत आहे. थप्पड या तापसी पन्नूच्या चित्रपटासाठी तिने रायटर म्हणून काम केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मृण्मयीचा आता चांगला जम बसला आहे.