गेल्या ६ दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे याचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांचे ते आजोबा होते. मृण्मयीच्या आईचे माहेरचे कुटुंब अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. आजोबा, आजी आणि तिच्या आईने नाटकातून एकत्रित काम केले होते. त्यांच्याच अभिनयाचा वारसा मृण्मयी आणि गौतमीने देखील पुढे चालवलेला पाहायला मिळतो. अरविंद काणे यांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. १९५३ साली त्यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल टाकले होते.
तो मी नव्हेच हे नाटक त्यांनी त्यांच्या अभिनयाने चांगलेच गाजवलेले पाहायला मिळाले. या नाटकाचे राज्यभर जवळपास ७५० प्रयोग करण्यात आले होते. अरविंद काणे यांनी छोट्या पडद्यावर नात गौतमीसोबत काम केले होते. पत्नी, मुलीसोबत आपण काम केले पण आता नातीसोबतही आपल्याला काम करता यावे अशी त्यांची इच्छा होती. झी मराठी वाहिनीच्या माझा होशील ना मालिकेतून अरविंद काणे यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. नात गौतमीसोबत ते एका सीनमध्ये झळकले होते. गौतमी देशपांडे ही आपल्या आजोबांच्या खूप क्लोज होती, त्यामुळे त्यांच्या निधनाने गौतमी खूपच खचून गेली आहे. आजोबांचा प्रवास तिने तिच्या भावनिक पोस्टमधून उलगडला आहे. गौतमी म्हणते की, प्रिय आजोबा पत्रास कारण कि, आज तुमच्या आयुष्याच्या तिसऱ्या अंकाचा पडदा पडला!
आज माझ्या आजोबांची, आईच्या मामाचा बाबांची, आज्जीच्या प्रेमळ नवऱ्याची, उत्तम भावाची, आदर्श मुलाची अशा सगळ्या भूमिका असलेलं तुमच तीन अंकी नाटक इथेच संपलं. पण आजोबा काय सांगू तुम्हाला, इतक्या कमाल वठवल्यात तुम्ही सगळ्या भूमिका! प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण जपलं तुम्ही. कथानक पण काय सुंदर आणि नाट्यमय होतं हो नाटकाचं सुरूवात झाली ती स्वतःचे वडील जाण्यापासून. नंतर आईचा पुनर्विवाह, नवीन कुटुंबामध्ये प्रवेश, नवीन भावांचं सक्ख्यानपेक्षा जास्त प्रेम. तुमच्यासारख्या handsome नायकाला साजेल अशा सुंदर नायिकेचा आयुष्यात प्रवेश. नायकाचं नाटकाविषयाचं प्रेम, लग्न, दोन गोड मुलांचा जन्म. सारंच कथानक एखाद्या फिल्मला लाजवेल असा. तुमचे एक एक प्रवेश पण काय लाजवाब आजोबा.
“एखाद्याचं नशीब” म्हणत एक सुंदर नायिका आयुष्यात आली, नकळत पणे मनाचे धागे जुळत गेले . मग “याला जीवन ऐसे नाव” म्हणत तुम्ही पुढे गेलात. “अशी पाखरे येति” म्हणत संसार सुरु झाला. “नाटककराच्या शोधात तुम्ही सहा पात्र” फिरत गेलात. पुढे “शेहेनशाह” बनून तुम्ही “नटसम्राट” असल्याचा दाखवून दिलंत. दुःखांकडे पाठ फिरवत हसतमुखानं “तो मी नव्हेच” म्हणत राहीलात. असे आयुष्याचे खरे खुरे “किमयागार” ठरलात, “चाणक्य” बुद्धीने सतत आरोग्यक्षेत्राला योगदान देत आलात. तीन अंक कुठे कसे संपले कळलंच नाही. प्रेक्षक प्रत्येक नाटकातून काही ना काही घेऊन जातो. यातून काय बरोबर घेऊन जाऊ अन काय नको असा वाटतंय. त्यामुळे हे नाटकच आता सोबत ठेवणारोत आयुष्यभर. तुम्ही आता मात्र शांत व्हा, दमला असाल तुम्ही.
आता खऱ्या अर्थानी पडदा पडला आहे. नाटक संपल्यानंतर तो तुमच्यातला नट आता शांत आणि समाधानी आहे. तुमच्यातला हा ‘नट’ आम्ही आमच्यात आयुष्यभर जागा ठेवू. अन तुमच्या १० टक्के तरी चांगुलपणा आणि सकारात्मकता आमच्यात यावी अशी प्रार्थना करू. तुमच्याच एका प्रवेशातल हे वाक्य, झालेत बहू ,असतील बहू , होतील बहू ,पण या सम हा. रंगदेवतेला वंदन करून हा तीन अंकी प्रवेशाचा पडदा पडला असं जाहीर करते. अन त्या नटसम्राटास पुन्हा एकदा वंदन करते. तुमची नात आणि तुमची फॅन, गौतमी.