खुपते तिथे गुप्तेच्या शोमध्ये आजवर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र आता पहिल्यांदाच या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभिजित बिचुकले यांनाही या शोमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. राजकीय वर्तुळात त्यांना पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती व्हायचंय अशी ते इच्छा व्यक्त करत असतात. येत्या १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या खुपते तिथे गुप्तेच्या विशेष भागात अभिजित बिचुकले हजेरी लावणार आहेत. त्यामुळे हा धमाल एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक झाले आहेत.
अभिजित बिचुकले यांनी मराठी बिग बॉसच्या २ सिजनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या बेताल वक्तव्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर ते हिंदी बिग बॉसमध्ये झळकले पण या घरात वाद झाल्याने त्यांना आयोजकांनी घराबाहेर काढले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कसबा येथील निवडणूक लढली होती त्यावेळी त्यांना अवघ्या ४७ मतांवर समाधान मानावे लागले होते. सातारा जिल्ह्यातील बुचुकले हे त्यांचं गाव. गावातूनच शालेय शिक्षण घेणाऱ्या अभिजित बिचुकले यांनी पदवीच्या शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. १९९७ साली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पुढे साताऱ्यातील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयातून पदवी मिळवली.
२०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. अर्थात या क्षेत्रात मिळालेल्या अपयशाची त्यानी कधीच चिंता केली नाही. त्यांचा हाच प्रवास अधिक जाणून घेण्यासाठी अवधूतने शोमध्ये बोलावले आहे. आता या शोमध्ये अभिजित बिचुकले यांची फाडफाड बोलणारी इंग्रजी पाहून अवधूत मात्र बुचकळ्यात पडला आहे. कारण बिचुकले यांचे इंग्रजी शब्द कुठल्याच डिक्शनरीमध्ये सापडणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे बिचुकले यांना कोणते प्रश्न विचारावेत हाच मोठा प्रश्न अवधूतला पडला आहे. बिचुकले यांच्या एंट्रीने शोला चांगला टीआरपी मिळणार हे सर्वश्रुत आहे. या मुलाखतीतून काही साध्य होणार की नाही हे माहीत असूनही केवळ एक मनोरंजन म्हणून लोक या शोला चांगला प्रतिसाद देतील. त्यामुळे १० तारखेचा एपिसोड सर्वार्थाने गाजणार असेच चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे.