कलर्स मराठी वाहिनीवर सिंधुताई माझी माई ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनन्या टेकवडे हिने बालपणीच्या सिंधुताई साकारल्या आहेत. तर प्रिया बेर्डे यांनी आजीची भूमिका साकारली आहे. किरण माने, योगिनी चौक, अभिजित झाडे, शर्वरी पेठकर, आनंद भुरचंडी या कलाकारांची मालिकेला साथ मिळाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने किरण माने आणि प्रिया बेर्डे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी किरण माने यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
तो कलाकार म्हणून उत्तम आहेच पण माणूस म्हणूनही तो चांगला आहे अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे देतात.
सोबतच मालिकेच्या गमतीजमती देखील या दोघांनी अनन्यासोबत शेअर केल्या आहेत. याच मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी आपल्या कठीण काळातला प्रसंग शेअर केला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जाण्याने तर प्रिया बेर्डे यांनी खूप वाईट काळ अनुभवला. त्या म्हणतात की, लक्ष्मीकांत गेले त्याच्या अगोदर माझे आई वडीलही गेले होते. माझ्यासोबत माझी आजी होती पण ५ जुलैला आजी गेली त्यानंतर १६ डिसेंबरला लक्ष्मीकांत गेले. त्यानंतर माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. ती भरून कशी काढायची आर्थिक, मानसिक या सगळ्याच बाजूने ती पोकळी निर्माण झाली होती. आता आपल्या आयुष्यात पुढे काहीच नाही असा विचार येत होता. ही दोन मुलं मोठी कशी करायची? त्यांना सांभाळायचं कसं?
हा विचार करत बसलेली असताना एक दिवस स्वानंदी म्हणाली की, मम्मी पप्पा कुठे गेलेत? तर अभिनय तिला खडकीपाशी घेऊन गेला आणि म्हणाला की ते स्टार आहे ना, ते आपले पप्पा आहेत. तो तिला म्हणायचा की तू दहावीला गेली ना की तुला पप्पा भेटायला येणार. पण दहावीपर्यंत तिला कळलं होतं की पप्पा कधीच नाही येणार. ती रात्र माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. तेव्हा मला जाणवलं की ह्या एवढ्याशा मुलाला एवढी अक्कल आहे त्याला समजावण्याचं कौशल्य आहे. हे बघूनच मला प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली. त्या दोन मुलांकडे पाहून मला वाटलं की, आता बास झालं खूप रडून झालं. आपण सगळ्यांसाठी सगळं केलं, सगळ्यांची सेवा सुद्धा केली पण आता तुला तुझ्या मुलांसाठी उभं राहायचंय, स्वतःसाठी उभं राहायचंय. ती रात्र मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.