सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी मराठी सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवलेला पाहायला मिळाला. सचिन पिळगांवकर हे लहान असल्यापासूनच चित्रपटातून काम करत होते. पुढे हिंदी चित्रपटातून नायकाची भूमिका साकारल्यानंतर ते मराठी सृष्टीकडे वळले. अष्टविनायक या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका बजावली. अभिनय क्षेत्राच्या जोडीलाच ते दिग्दर्शकाचीही भूमिका बजावू लागले. अशोक सराफ यांच्याशी त्यांची छान मैत्री झाली. अनेक चित्रपटातून ही जोडी गाजली देखील.
आपल्या बहुतेक चित्रपटातून अशोक सराफ यांच्यासाठी भूमिका ठरलेली असायची. सचिन आणि अशोक या जोडगोळीने अनेक कलाकृती एकत्रित घडवल्या. त्यामुळे अशोक सराफ हे आपले मोठे भाऊच आहेत असे सचिन पिळगावकर मानत असत. एकीकडे हे समीकरण जुळले असताना मराठी सृष्टीत आणखी एक जोडगोळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ती म्हणजे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची. या दोघांनीही अनेक चित्रपट एकत्रित केले. या मैत्रीचा किस्सा सचिन पिळगावकर यांनी मी होणार सुपरस्टारच्या मंचावर शेअर केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार या रिऍलिटी शोचे दुसरे पर्व सुरू आहे. या शोमध्ये सचिन पिळगावकर हे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत.
यावेळी हा मैत्रीचा किस्सा सांगत असताना सचिन पिळगावकर म्हणतात की, अशोकने एक वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या आयुष्यात निभावली, मोठ्या भावाची. तेव्हा माझी त्याच्याशी एक वेगळ्या प्रकारची मैत्री सुरू झाली, मग एक वेगळी साथ सुरू झाली. त्या साथीला ना हा लक्ष्या खूप जळायचा. कारण त्याच्याबरोबर मी कधीच काम नव्हतं केलं. त्याला असं वाटायचं की मी काम नाही केलं म्हणून माझी मैत्री नाही झाली. तो सारखं म्हणायचा की एकदा तरी मी ना तुझ्यासोबत काम करूनच दाखवेन. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सचिन पिळगांवकर यांच्या अशी ही बनवाबनवी चित्रपटातून काम केले. तेव्हापासून त्यांच्यातल्या मैत्रीचेही सूर जुळत गेले.