प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी नुकतीच एक दिलखुलास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवाबद्दल गप्पा मारल्या आहेत. प्रवीण तरडे लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. खलनायकच्या भूमिकेला एक वेगळेच महत्व असते. त्यामुळे मला ही भूमिका करायला जास्त मज्जा आली असे प्रवीण म्हणतो. दाक्षिणात्य सृष्टीकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तिथे सगळं काम अगदी वेळेतच व्हायला लागतं. ७ ची शिफ्ट म्हणजे सकाळी ७ वाजताच तुमचा सिन पूर्ण झाला पाहिजे असा नियम आहे आणि हे नियम ते काटेकोरपणे पाळतात.
मला माझ्या भूमिकेसाठी २ तास तयार व्हायला लागायचे. त्यामुळे पहाटे साडेतीन वाजता उठून मी तयारीला लागायचो असे प्रवीण दाक्षिणात्य चित्रपटातील अनुभवाबद्दल बोलतो. मुळशी पॅटर्न याच चित्रपटावरून सलमान खानने अंतिम चित्रपट बनवला. पण त्यांनी चित्रपटाची पूर्ण वाट लावून टाकली असे प्रवीण आणि उपेंद्र दोघेही मत व्यक्त करतात. मुळशी पॅटर्न जसाच्या तसा केला असता तर नक्कीच चालला असता. पण मी अंतिम चित्रपट अजूनही पाहिलेला नाही आणि माझी तो पाहायला तेवढी हिम्मत देखील होणार नाही असे प्रवीण म्हणतो. सलमान खानने या चित्रपटाचं मोठं कौतुक केलं. एक मित्र म्हणून तो व्यक्ती खूप चांगला आहे. मराठीत हा चित्रपट अप्रतिम बनला. या चित्रपटासाठी मी माझ्या बायकोचे दागिने विकले होते. माझ्याजवळ पैसे नसतानाही माझ्या मित्रांनी या चित्रपटात काम केलं.
लोकं म्हणतात की मी माझ्या मित्रांचा दिग्दर्शक आहे. माझ्या चित्रपटात तेच तेच लोक असतात असेही म्हटले जाते. हो कारण माझ्या कठीण काळात या मित्रांनीच मला साथ दिली होती. माझ्या अडचणीच्या काळात या मित्रांनी फुकट काम केलं त्यांना मी कसा विसरू?त्यावेळी जर हे पैशांसाठी अडून बसले असते तर प्रवीण तरडेने कुठून आणला असता पैसा? मुळशी पॅटर्न चित्रपट शेतकऱ्यांचा होता. हा चित्रपट १०० कोटींच्या घरात नक्कीच गेला असता. पण मीडिया माध्यमातून काही लोकांनी हा चित्रपट गुंडांचा आहे अशी बातमी पसरवली. समाज माध्यमातून या चित्रपटाबाबत विरोधी प्रतिक्रिया देण्यात येऊ लागल्या त्यामुळे हा चित्रपट जास्त कमाई करू शकला नाही. नाहीतर तो १०० कोटींच्या घरात नक्कीच गेला असता. अशी खंत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.